आहारात याचा करा वापर : उन्हाळा होईल सुसह्य !
एप्रिल महिन्यातच वाढलेल्या उन्हामुळे अनेकांना उष्माघात किंवा हिट स्ट्रोक चा त्रास होत आहे, हा त्रास आपल्याला होऊ नये म्हणून आहारातून काळजी घेणे गरजेचे आहे . त्यासाठी आपल्या दररोजच्या आहारात काही गोष्टीचा समावेश केल्यास नक्कीच उन्हाळा सुसह्य होईल.
उन्हाळ्यात उष्णतेमुळे शरीरातील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी घाम जास्त येतो. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. परिणामी अनेकांना डीहायड्रेशन, डोकेदुखी, ऍसिडिटी, डोळ्यांची जळजळ होणे,लघवीच्या जागी जळजळ होणे, हाता पायांची आग होणे, अशक्तपणा येणे असे बरेच त्रास होतात, अनेकांना त्वचा विकार देखील होतात, म्हणूनच शरीराची उष्णता वाढू नये यासाठी आपण थंडावा देणाऱ्या लिक्विड किंवा द्रव पदार्थांचा समावेश आपल्या आहारात केला पाहिजे.
*उन्हाळ्यात आपण दिवसाची सुरुवात ही गुलकंद खाऊन करू शकतो. आपण दररोज सकाळी उपाशी पोटी एक चमचा गुलकंद खाल्ला तर आपल्या शरीराला थंडावा मिळेल आणि दिवसभर आपल्याला उष्णतेचा त्रास होणार नाही.
*धने , जिरे, बडीशेप, खडीसाखर याची एकत्रित पूड करून आपण घरी ठेवू शकतो. दिवसातून दोन-तीन चमचे ही पूड आपण पाण्याबरोबर घेतली तरी उष्णतेचा त्रास होणार नाही.
* धने डाळ, बडीशेप, आवळ्याचे चूर्ण आणि खडीसाखर एकत्रित करून मुखवास करून घरी ठेवावे. अधून मधून हे मुखवास खाल्ल्याने आपल्या शरीराची उष्णता कमी व्हायला नक्कीच मदत होते.
* उन्हाळ्याच्या दिवसात कधीही उपाशी पोटी बाहेर पडू नये एक ग्लास पाणी पिऊनच बाहेर पडावे जेणेकरून उष्णतेचा त्रास होणार नाही.
कितीही उन्हाळा वाढला तरीही कोल्ड्रिंक्स, पॅक ज्युसेस घेऊ नये कारण त्यामध्ये केमिकलचे प्रमाण असते आणि त्यामुळे आपल्या शरीराला त्रास वाढू शकतो. आपण त्याऐवजी शहाळ्याचे पाणी, लिंबू सरबत,आवळा सरबत, ताक, वाळा सरबत, सब्जा पाणी, कैरीचे पन्हे, सोलकढी असे काही पदार्थ घेऊ शकतो.
*रोज दुपारी जिरेपूड टाकून ताजे ताक आपण नक्कीच घेतले पाहिजे याने आपल्या शरीराला थंडावा प्राप्त होईल तसेच कितीही प्यावे वाटलं तरी फ्रीजचे थंडगार पाणी पिऊ नये कारण याने आपला त्रास अधिकच वाढेल आपण त्याऐवजी माठातील पाणी पिऊ शकतो. याने आपली तहान तर भागेलच मात्र त्याचबरोबर मातीचे मिनरल्स किंवा मातीच्या गुणधर्माचा फायदा देखील आपल्याला नक्की होईल.
उन्हाळ्यात आपला आहार सुद्धा हलका ठेवला पाहिजे. रोज जेवणातून देशी गाईचे चमचाभर साजूक तूप नक्की घ्यावे. तसेच आपण ज्वारीची किंवा नागलीची भाकरी देखील घेतली पाहिजे. उन्हाळ्यात आपण जास्तीत जास्त रसयुक्त फळे आणि भाज्यांचा वापर केला पाहिजे. भाज्या करताना लसूण आणि हिरवी मिरची तसेच अती मसालेदार पदार्थांचा वापर कमी करावा. तसेच उष्ण गुणधर्म असणाऱ्या भाज्या जसे फ्लॉवर ,वांगे, मुळा यांचा वापर कमी करावा.
आपण हिरव्या पालेभाज्या, दुधी, गिलके, शेंगा, कारले , टोमॅटो काकडी, कलिंगड, खरबूज, गाजर, संत्री अशा गोष्टींचा समावेश आपल्या आहारात दररोज आणि जास्तीत जास्त केला पाहिजे.
मग या उन्हाळ्यात आपल्याला उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून या काही गोष्टींचा समावेश आपल्या आहारात नक्कीच करा आणि आपले आरोग्य उत्तम ठेवा.
आहारतज्ञ क्षितीजा राहुल गायकवाड
एम एस्सी ( फूड सायन्स अँड न्युट्रिशन)
( लेखीका नाशिक शहरातील नामांकित आहारतज्ज्ञ असून त्या गेल्या सतरा वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत, शहरातील अनेक नामांकित रुग्णालयातील हजारो रुग्णांनी त्यांच्या सल्ल्याचा लाभ घेतला आहे. मधुमेह रुग्णाचा आहार, वजन कमी करण्यासाठी आहार आणि प्रसूतीमध्ये मातेसाठी उत्तम आहार या विषयात त्यांचा विशेष अभ्यास आहे )