झाशीची राणी लक्ष्मीबाई : शौर्याची अमर कहाणी
(स्मृतीदिन विशेष)
१८५८ साली ग्वाल्हेरच्या रणभूमीवर झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांनी ब्रिटीश सत्तेविरुद्ध लढा देत वीरमरण स्वीकारले. वयाच्या केवळ २९व्या वर्षी त्यांनी पराक्रम, धैर्य आणि स्वाभिमानाचा अभूतपूर्व इतिहास घडवला.
मणिकर्णिका तांबे हे त्यांचे मूळ नाव. वयाच्या लहानपणीच त्यांनी तलवारबाजी, घोडेस्वारी आणि युद्धकौशल्य आत्मसात केलं. झाशी संस्थानाचे राजे गंगाधरराव न्यूाळकर यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या झाशीच्या राणी झाल्या.
१८५७ च्या स्वातंत्र्यसमरात राणी लक्ष्मीबाई यांनी सक्रिय सहभाग घेतला. "मी माझी झाशी देणार नाही" या निर्धाराने त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध झाशीचे संरक्षण केले. अनेक पराभवांना सामोरे जात, सैन्य उभारणी करत त्यांनी झाशीबाहेरही लढाई चालू ठेवली.
१७ जून १८५८ रोजी ग्वाल्हेर येथे झालेल्या लढाईत त्यांनी शौर्याने झुंज देत वीरमरण पत्करले. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांची शौर्यगाथा भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणास्रोत ठरली.
आज त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. झाशीची राणी लक्ष्मीबाई हे नाव आजही पराक्रम, निडरता आणि मातृभूमीच्या प्रेमाचे प्रतीक मानले जाते.