कौटुंबिक हिंसाचारापासून पुरुषांनाही हवे संरक्षण

कौटुंबिक हिंसाचारापासून पुरुषांनाही हवे संरक्षण
  • Positive News
  • जून 13 2025

Share on  

कौटुंबिक हिंसाचारापासून पुरुषांनाही हवे संरक्षण

पुरुष म्हणजे मर्द त्यामुळे त्याच्यावर कोणी अन्याय करत असेल हे समाजाला मान्यच नाही. त्यातून पत्नी पतीचा छळ करते हे अनेकांना कल्पनातीत वाटते. घरेलू हिंसाचारामध्ये कायद्याने महिलांना जास्त संरक्षण दिले आहे पण काही महिला त्याचा गैरफायदा उठवताना दिसतात त्यामुळे या विषयावर सार्वत्रिक चर्चा करण्याची वेळ आली आहे.

सध्या  पत्नीकडून झालेली राजा रघुवंशी हत्या, बंगळूरच्या आयटी प्रोफेशनल अतुल सुभाष ने केलेली आत्महत्या आणि त्या पाठीमागची कारणे( पत्नी सासरे आणि न्यायिक अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासामुळे तो आत्महत्या करत असल्याचे अतुल सुभाषने स्पष्ट केले होते).
पत्नीपीडित पुरुषांची पिंपळ पूजा हा लेख पण वाचण्यात आला. सध्या देशात महिलांच्या सुरक्षेसाठीचे कायदे जास्त आहेत परंतु पुरुषांसाठी मात्र अशा प्रकारचे कायदे फार कमी आहेत त्यांनाही कौटुंबिक हिंसेचा सामना करावा लागतो हे सत्य आपल्याला नाकारता येणार नाही. सगळीकडे सर्रास नाही परंतु बऱ्याच ठिकाणी महिलांकडून त्यांच्यासाठी बनलेल्या कायद्यांचा दुरुपयोग केला जातो असे खुद्द सुप्रीम कोर्टाचे निवेदन आहे. 
पुण्याचे सध्याचे गाजत असलेले प्रकरण पाहता एकंदरीत महिलांवर अन्याय होण्याचे प्रमाण खूप जास्त आहे, बऱ्याच ठिकाणी केस नोंदवून पण घेतली जात नाही. 
तरीपण हल्ली पुरुषांवर आणि त्याच्या घरच्यांवर अन्याय करण्याचे प्रकार पण वाढत चालले आहेत ही गोष्ट आपल्याला नाकारता येणार नाही. नवऱ्याविरुद्ध किंवा सासरच्या लोकांविरुद्ध खोट्या तक्रारी करणे याचे प्रमाण वाढत आहे. समाजात पुरुषाला ताकतवान समजले जाते, त्याचे रडणे त्याचा त्रास हा समाजाला दिसत नाही कारण बऱ्याच वेळा पुरुष या सर्व गोष्टी चुपचाप सहन करत असतो. काही ठिकाणी काही महिला कायद्याने दिलेल्या अधिकारांचा गैरफायदा घेतात, पण समाज हे अजून स्वीकारत नाही यासाठी समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. 
अहमदाबाद मधील पत्नीपीडित पुरुष संघटनांमध्ये 68 हजारांपेक्षा जास्त सदस्य आहेत. या  संस्थेमध्ये सामान्य नागरिकांपासून ओनिवासी भारतीय, डॉक्टर्स ,आर्मीचे जवान हेही सदस्य आहेत.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो  नुसार 2021 मध्ये देशभरात 33.2% पुरुषांनी कौटुंबिक समस्यामुळे तर 4% पुरुषांनी लग्न विषयक समस्यामुळे स्वतःचा जीव गमावल्याचे स्पष्ट झाले आहे.
घरेलू हिंसेमध्ये सुरक्षेचे कायदे महिलांसाठीच जास्त आहेत या कारणामुळेच पत्नी जर पतीला मारहाण करीत असेल तर ती घरेलू हिंसेची केस समजले जात नाही ही एक शोकांतिका आहे.
पतीचा छळ या सदरात कोणत्या गोष्टी येतात:
पत्नीकडून पतीवर होणारा छळ किंवा अत्याचार यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होऊ शकतो:

* सतत वाद, शिवीगाळ किंवा मानसिक त्रास देणे
* खोटे आरोप करणे – जसे की हुंडामागणीचा आरोप, मारहाणीचा खोटा गुन्हा दाखल करणे
* आत्महत्या करण्याची धमकी देऊन मानसिक दबाव टाकणे
* शारीरिक मारहाण करणे
* पतीला घराबाहेर काढणे किंवा घरात राहू न देणे
* विवाहातील कर्तव्यांकडे दुर्लक्ष करणे किंवा  जाणीवपूर्वक पतीच्या गरजा नाकारणे
* पतीला नामर्द म्हणून हिणवणे 
* नातेवाईकांमध्ये त्याची बदनामी करणे
* पतीच्या नोकरीत/व्यवसायात अडथळे आणणे
* मुलांचा वापर त्रास देण्यासाठी करणे
* खोटे खटले दाखल करून मानसिक, आर्थिक, सामाजिक नुकसान करणे

पुरुषांना पण त्यांच्या अधिकारांची माहिती हवी:
पत्नी सतत त्रास देत असेल तर पती ही 100 किंवा 1091 वर कॉल करून पोलिसांची मदत घेऊ शकतात, स्वनिर्मित मिळकत म्हणजेच स्वसंपादित मिळकतीवर फक्त पुरुष अर्थात पतीचा अधिकार असतो त्याच्यावर पत्नीचा किंवा मुलांचा कोणताही अधिकार नसतो तो त्याच्या इच्छेनुसार कोणालाही ती मिळकत देऊ शकतो किंवा एखाद्या ट्रस्टला सोपवू शकतो मानसिक छळ करणाऱ्या पत्नी विरुद्ध पती पोलीस आणि कोर्ट दोघांची मदत घेऊ शकतो. 

   पतीला मिळू शकणारे कायदेशीर संरक्षण:

1. भारतीय दंड संहिता (Indian Penal Code - IPC)

   कलम 120B – फसवणूक करण्यासाठी केलेली कट रचना

जर पत्नीने कुटुंबीयांसोबत मिळून पतीला फसवण्यासाठी, ब्लॅकमेलसाठी किंवा खोटे खटले टाकण्यासाठी कट रचला असेल तर या अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो.

   कलम 182 – खोटी माहिती देऊन अधिकाऱ्यांना  भ्रमित करणे

पोलिसांकडे खोटी तक्रार देऊन एखाद्यावर गुन्हा दाखल होईल अशी माहिती दिल्यास हे कलम लागू होते.

   कलम 191, 192, 193 – खोटे साक्ष व खोटा पुरावा सादर करणे

खटल्यात खोटी साक्ष दिल्यास किंवा खोटा पुरावा सादर केल्यास ही कलमे लागू होतात.

   कलम 211 – खोटा गुन्हा दाखल

कोणत्याही व्यक्तीवर खोटा गुन्हा दाखल केल्यास या अंतर्गत कारवाई केली जाते.

  कलम 500 – बदनामी (मानहानी)

पत्नीने पतीची सार्वजनिक बदनामी केल्यास (उदा. सोशल मिडिया, समाजात, नातेवाईकांसमोर खोटी बदनामी केल्यास) या अंतर्गत दावा करता येतो.
2. घटक कायदे (Other Legal Remedies)

  CRPC कलम 482 – खोटे खटले रद्द करण्यासाठी हायकोर्टात अर्ज

खोट्या FIR किंवा खटल्याविरुद्ध हायकोर्टात अर्ज करून तो खटला रद्द करता येतो.

   हानीभरपाई दावा (Civil Suit for Defamation or Damages)

पत्नीच्या चुकीच्या वागणुकीमुळे मानसिक त्रास, सामाजिक बदनामी, आर्थिक नुकसान झाल्यास त्यासाठी नुकसानभरपाई मागता येते.

   घटस्फोटासाठी अर्ज – हिंदू विवाह कायदा कलम 13(1)(i-a)

पत्नीने अत्याचार, मानसिक त्रास, खोटे खटले दिल्यास यावर आधारित "क्रूरतेचा" आधार घेऊन घटस्फोटाचा अर्ज करता येतो.

  पतीच्या हक्कासाठी संरक्षण – पुरुष हक्क चळवळी (Men’s Rights Movements)

ज्या संघटना पुरुषांच्या हक्कासाठी काम करतात, त्यांच्या सहाय्याने कायदेशीर आणि मानसिक मदत मिळू शकते.

   महत्वाचे न्यायालयीन निर्णय (Landmark Judgments)

Preeti Gupta vs. State of Jharkhand (2010) – सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की महिलांकडून दिल्या जाणाऱ्या खोट्या तक्रारी ही गंभीर समस्या आहे.

Rajesh Sharma vs. State of UP (2017) – सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की IPC 498A अंतर्गत अनेक खटले खोटे आणि दुर्भावनायुक्त निघाले आहेत, म्हणून अटक टाळण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत.

पतीलाही भरणपोषणाचा अधिकार:
महिलांप्रमाणे पतीलाही हिंदू मॅरेज ॲक्ट मध्ये भरणपोषणाचा अधिकार देण्यात आलेला आहे. कायदे पुरुषांसाठीही आहेत त्यामुळे पुरुषांनी दबावाखाली येऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये

Adv Nitin Bhalerao, Nashik
Mob: +91 97129 06353

संबंधित बातम्या