होय होय वारकरी…जाय जाय पंढरी

होय होय वारकरी…जाय जाय पंढरी
  • Positive News
  • जुलै 6 2025

Share on  

होय होय वारकरी…जाय जाय पंढरी

डॉ.प्रशांत भरवीरकर
9503677740

आज आषाढी एकादशी...अवघ्या महाराष्ट्राला एका सूत्रात बांधून ठेवणारी तिथी. पंढरीचा विठोबा हे अखिल महाराष्ट्राचे आराध्यदैवत आहे. कपाळी अबीर लावलेला, पांढरीधोट बंडी आणि धोतर, गळ्यात उपरणे, डोक्याला लालभडक मुंडासे, गळ्यात तुळशीची माळ आणि हातात टाळ घेतलेला वारकरी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. नक्की काय आहे ही वारी परंपरा. कोणत्याही आमंत्रणाशिवाय लाखों स्त्री, पुरूष श्रीविठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जमतात, काय आहे यामागची भावना. हे दैवत कुठून आले. ‘कर्नाटक वाटे, आला पायी तुडवित काटे’ असे म्हटले जाणारा विठोबा आमचे आराध्यदैवत कधी झाला. कधी मनामनात घर करून बसला. वारकरी संप्रदाय कसा निर्माण झाला. प्रश्न हजार आहेत उत्तर एकच ‘आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी’ यात भोळा भाव असेलही परंतु तोच तर आनंदाचे निधान आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे चिरंजीव श्री नारायण महाराज यांनी वारीची परंपरा सुरू केली. श्रीनिवृत्तीनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली, सोपानकाका, मुक्ताई, संत नामदेव महाराज यांनी ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ म्हणत पंढरपूर जवळ केले आणि वारीची प्रथा सुरू झाली. चंद्रभागेच्या वाळवंटात ‘नाचू कीर्तनाचे रंगी, लावू ज्ञानदीप जगी’ म्हणत नामदेवरायांनी कीर्तन रंगवले. त्यांच्या कीर्तनात खुद्द परमात्मा परमेश्वर विठ्ठल नाचू लागला. इतका नाचू लागला की, ‘नाचता नाचता देवाचा गळला पीतांबर, सावध होई देवा ऐसा बोले कबीर, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग’ त्या अखिल विश्वाच्या प्रणेत्याला देहावरील वस्त्राचे भान ज्यात राहत नाही ते कीर्तन नामदेवादी संतांनी रंगवले. आजही कमरेला शेला बांधून आमचा वारकरी बंधू कीर्तनाला उभा राहतो तेव्हा चार आठ क्षण संसारातील त्रिविध ताप विसरायला होतात. देहाची झालेली भावविभोर अवस्था म्हणजेच पांडुरंग होणे आहे, लक्षात येतंय ना? शेवटी तो आणि मी वेगळा नाही, एकच आहोत हेच तर आपल्याला व्हायचे आहे. द्वैताकडून अद्वैताकडे जाणे हेच तर सर्व वेदांचे सार आहे. सर्व शास्त्र-पुराणांचे म्हणणे तेच तर आहे. दोन म्हटल्यावर कबीरजी नाराज होतात. दोन नाही एकच. विठ्ठल व मी एकच आहे, हेच तर वारीचे मर्म आहे. संत गोरोबा काकांच्या घरी श्री नामदेवराय आले तेव्हाचा अभंग आहे, ‘निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे...तव झालो प्रसंगी गुणातीत’ हे गुणातीत होणे, गुणांच्या पलिकडे निघून जाणे म्हणजेच श्रेयस आहे. 'म्हणे गोरा कुंभार, नाम्या तुझी भेटी। सुखासुखी मिठी, पडली कैची।।' श्रीविठ्ठलाची भक्ती आपल्याला आणखी वेगळे काय शिकवते? संशोधकांनी पिंजून काढलेले श्रीविठ्ठल हे दैवत ‘दशांगुळे व्यापूनी’ उरले आहे. हजारों किलोमीटर पायी जाऊन पंढरपूरी त्या परमदैवताचे दर्शन घेतल्यावर वारकरी बांधवांच्या आनंदाला, सुखाला पारावार राहात नाही. ‘सुखाचे हे सुख, श्रीहरी मुख’ म्हणत तो या देवाच्या पायाशी लीन होतो आणि स्वर्गसुखाचा आनंद त्याला लाभतो. वैष्णव धर्माची पताका अखिल ब्रह्मांडात अशीच कीर्तिमान राहो. जय हरी.

 

संबंधित बातम्या