मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून समाज कल्याण अधिकारी, गट ब संवर्गात निवड झालेल्या अधिकाऱ्यांना प्रथम नियुक्तीपत्रांचे वितरण केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाने आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. शासनामध्ये अधिकारी म्हणून काम करत असताना जनतेने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे, हीच खरी लोकशाहीची ताकद आहे. शासकीय सेवेच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य आपल्या हातून घडावे, राज्याच्या विकासात आपले योगदान महत्वाचे ठरेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
सामाजिक न्याय विभाग हा समाजातील वंचित घटकांसाठी कार्य करणारा अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. समाजातील शेवटच्या घटकाची सेवा करण्याची संधी या विभागात काम करताना मिळते. समाजातील सर्व घटक जोपर्यंत मुख्य प्रवाहात येत नाहीत तोपर्यंत आपण सर्वांगीण विकासाचे स्वप्न पूर्ण करू शकणार नाही. आपण सर्व अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करून समाजातील शेवटच्या घटकाच्या आयुष्यात परिवर्तन घडविण्याचे कार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.
यावेळी मंत्री संजय शिरसाट, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर व इतर मान्यवर उपस्थित होते.