नासिक : आपणच आपल्या जैवविविधतेला निर्माण केलेली आव्हान.
आज एकीकडे विविध स्तरावर जंगल वाचवण्याचा प्रयत्न किंवा ठिक ठिकाणी वृक्ष लागवड करून ते जोपासण्याचा सकारात्मक प्रयत्न सुरू आहे. पण त्याचबरोबर जे काही मोठे संकट आपल्या जैवविविधतासाठी उभे राहत आहेत, ते म्हणजे टिकोमा, कॉसमॉस, लिली, रान तुळस, गुलतुरा, रानमारी, सुबाभूळ, वेडी बाभूळ ,ग्लेरीसिडिया इत्यादींसारख्या परदेशी वनस्पतीं, हे तेवढेच गांभीर्याने लक्षात घेतलं पाहिजे. ह्या उपद्रवी वनस्पतींचे आपल्या जैवविविधतेवर मोठ्या प्रमाणात व जलदगतीने आक्रमण करत आहेत. काही ठिकाणी ह्या उपद्रवी वनस्पतींनी प्रचंड प्रमाणात , जंगल,गायरान, शेताच्या बांधावर, पडीक जमीनीं वर, डोंगर दऱ्यांमध्ये जागा व्यापल्या आहेत व तेथील जैवविविधता संपुष्टात आणली आहे. हि बाब आपल्याला लक्षात येत नाहीये. आज हेच बिट्टि, टिकोमा, कॉसमॉस, गुलतुरा, लिली हे जी काही परदेशी शोभिवंत वनस्पती म्हणून नर्सरीमध्ये पुर्वी आणल्या गेल्यात व कोनोकॉर्पस सारख्या वृक्ष प्रजाती आणल्या जातात, ह्यावर आधी त्या प्रजातींचा आपल्या वातावरणावर व भुभागावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करूनच विक्रीस परवानगी दिली पाहिजे. त्यापैकी आपण टिकोमा, बिट्टि, लिली ह्या वनस्पतींची, ह्याच्या दुष्परिणामाविषयी न समजून घेता महामार्गच्या व इतर रस्त्याच्या दुभाजका मध्ये शोभिवंत वनस्पती व जनावर ह्यांना खात नाही म्हणून यांची मोठ्या प्रमाणात लागवड केली गेली आहे. आता याचा दुष्परिणाम बऱ्याच ठिकाणी दिसून येतोय. त्या भागातील शेतीमध्ये किंवा पडीत जमीनीवर, रानांमध्ये, वनांनमध्ये व घाटांमध्ये, ह्या आक्रमक वनस्पतीच्या बियांचे प्रसारण होऊन रोप उगलेले आपल्याला जिकडे तिकडे सध्या बघावयास मिळत आहे. त्यामुळे तेथील स्थानिक उपयुक्त वनस्पतींवर परीणाम होऊन त्या नामशेष होत चाललेल्या आहेत. यामुळे ज्या गवतांवर व वनस्पतींवर अवलंबून असलेल्या उपयुक्त किटकांना, वन्यजीवांना पोषख वातावरण निर्माण होण्यास अडचणी येत आहेत व पाळीव जनावरांना काही भागात चाऱ्याची कमतरता दिसून येत आहे. असल्या या वनस्पतींची रस्त्याच्या दुभाजका मध्ये किंवा रस्त्याच्या दुतर्फा लागवड करताना त्याच्या घातक परिणामा विषयी नक्कीच संबंधित विभागाने सखोल अभ्यास करून मगच उपयुक्त वनस्पतींची लागवड करणे गरजेचे झालेले आहे. असल्या या वनस्पतीमुळे शेती मधील पिकांवर पण वेगवेगळ्या प्रकारचे रोगराई दिसून येते. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी कृषी विभागाला पिकांवर नवनवीन रोगाचे व उपद्रवी किटकांचे आव्हान निर्माण झालेली दिसतायत. कृषी विभाग व वन विभागाने ह्या गोष्टींकडे गांभीर्याने बघून संबंधित विभागाला या गोष्टी निदर्शनास आणून देणे गरजेचे झालेले आहे. त्यामुळे अभ्यासपूर्वक जर त्या त्या भागात, थोडक्यात योग्य ठिकाणी आपल्या कडील योग्य त्या प्रकारची, उदाहरणार्थ:- निरगुडी, काळी निरगुडी, पांढरपळी, धायटी, पांढरा कुडा, मुरुड शेंग, चित्रक, तरवड, हेंकळ, दुरंगी बाभूळ, गुलाबी बाभूळ, आमोनी, अरणी, मेहंदी , पांढरा कांचन , पिवळा कांचन, कोरांटी, इत्यादी वनस्पतींची जर लागवड झाली तर नक्कीच सौंदर्याबरोबर तेथील जैवविविधता टिकवण्यास आपल्याला मदतच होईल, व त्या त्या भागातील पर्यावरणीय परिसंस्था अबाधित राहण्यास, जैवविविधतेसाठी शाश्वत वातावरण तयार होऊन वन्यजीवांचा अधिवास शाबूत रहाण्यास मदत होईल. खऱ्या अर्थाने ग्रीन फील्ड मार्ग तयार होतील.
सध्या आपल्याला वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करण्याबरोबरच अशा घातक आक्रमण करणाऱ्या वनस्पतींन चे उच्चाटन करण्याची गरज निर्माण झालेली आहे.
ह्या बाबतीत ठोस पावलं उचलून, संबंधित विभागा बरोबरच, सामाजिक स्तरावर ह्या वनस्पतींना वेळीच आटोक्यात आणण्याची गरज आहे.
आम्ही आमच्या परीने नाशिक देवराई, नाशिक वनराई व शक्य त्या ठिकाणी , ह्याबाबतीत काम करत आहोतच.
शेखर गायकवाड,
आपलं पर्यावरण संस्था, नासिक.
९४२२२६७८०१/ ९१३०२५७८०१