दिनांक: २६ जुलै १८६९ – २६ जुलै २०२४
सर्व नाशिककरांना नाशिक जिल्ह्याच्या १५५ व्या वर्धापन दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन!
२६ जुलै १८६९ रोजी शासन आदेशानुसार नाशिक जिल्ह्याची औपचारिक स्थापना झाली आणि त्यानंतरचा हा गौरवशाली प्रवास आज १५५ वर्षांचा झाला आहे.
नाशिक हे प्राचीन काळापासून एक महत्त्वाचे शहर राहिले आहे. मौर्य, सातवाहन, यादव, मोगल, निजाम, मराठे आणि पेशवे या सर्वांच्या कारकिर्दीत नाशिकचे नाव सतत ऐतिहासिक घटनांमध्ये अधोरेखित झाले.
नाशिकला "नाशक" आणि खानदेशाला "आशक" असे म्हटले जाई. इतिहासात अनेक लढाया या प्रदेशात झाल्याचे दाखले आहेत. नाशिकच्या निसर्गरम्य वातावरणामुळे मोगलांनी याचे नाव गुलशनाबाद ठेवले होते.
१७५१ च्या भालकी तहानुसार निजामाने नाशिक मराठ्यांना देण्याचे मान्य केले. पुढे नानासाहेब पेशव्यांनी चातुर्याने नाशिकचा ताबा घेतला. नाशिक पेशव्यांची उपराजधानी बनले आणि त्र्यंबकेश्वरचा किल्ला संरक्षण किल्ला झाला.
तेव्हा म्हणत असत, "ज्याच्या ताब्यात त्र्यंबकेश्वरचा किल्ला, तोच नाशिकचा मालक!"
१८१८ मध्ये दुसऱ्या बाजीरावाच्या पराभवानंतर इंग्रजांनी नाशिक बिनलढाई ताब्यात घेतले.
तेव्हा नाशिक ही एक गजबजलेली पण गलिच्छ धार्मिक वसाहत होती. इंग्रजांनी सुधारणा करत नाशिकमध्ये रेल्वे, टेलिग्राफ, तोफखाना केंद्र, नोट प्रेस, डिस्टिलरी आणि गोल्फ क्लबसारखे महत्त्वाचे उपक्रम सुरू केले.
२६ जुलै १८६९ रोजी मुंबई प्रांताच्या बैठकीत नाशिकला स्वतंत्र कलेक्टरेट (जिल्हा) म्हणून मान्यता मिळाली.
या आदेशानुसार अहमदनगर आणि खानदेश जिल्ह्यांतील काही तालुके नाशिक जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आले:
अहमदनगरहून: नाशिक, सिन्नर, इगतपुरी, दिंडोरी, चांदोर, निफाड, सावरगाव, अकोला, पेठ
खानदेशहून: मालेगाव, नांदगाव, बागलाण
१९९६ मध्ये: त्र्यंबकेश्वर तालुक्याची निर्मिती
स्वतंत्र संस्थान असलेले सुरगाणा १९४७ मध्ये नाशिक जिल्ह्यात समाविष्ट
१८५५: नाशिक–महू टेलिग्राफ लाईन
१८६५: नाशिक नगरपालिकेची स्थापना
६ ऑगस्ट १८६५: श्री करशेटजी नुसर्वाणजी हे पहिले म्युनिसिपल कमिशनर व पोलीस इन्स्पेक्टर
१८६९: श्री आर. सी. ओवेन्स हे पहिले जिल्हाधिकारी
२० मार्च १८७९: Nassick चे अधिकृतरित्या Nasik असे नामकरण
आज नाशिक धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात आघाडीवर आहे. नाशिकच्या द्राक्ष, कांदा, वाइन, त्र्यंबकेश्वर मंदिर, कुंभमेळा यामुळे हे शहर जागतिक नकाशावर ओळखले जाते.
नाशिकच्या १५५ वर्षांच्या वाटचालीचा हा सुवर्ण क्षण आपल्यासाठी अभिमानाचा आहे.