भारतीय घरांमध्ये ताजे अन्न खाणे ही जणू अलिखित परंपराच आहे. आयुर्वेदातही शिजवलेले अन्न तीन तासांच्या आत खावे असे सांगितले जाते. मात्र, अलीकडच्या काही वर्षांत तज्ज्ञ शिळी चपाती आणि शिळा भात यांचे काही आरोग्यदायी फायदे सांगत आहेत. योग्य पद्धतीने ठेवलेले व नैसर्गिकरित्या आंबलेले (फर्मेंट झालेले) अन्न पचन आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
रात्री उरलेली शिळी चपाती किंवा शिळा भात नैसर्गिकरित्या आंबल्यावर त्यामध्ये रेझिस्टंट स्टार्चचे प्रमाण वाढते. हा स्टार्च लहान आतड्यात न पचता मोठ्या आतड्यांमध्ये उपयुक्त जिवाणूंना पोषण देतो. त्यामुळे पचनसंस्था अधिक सक्षम होते. संशोधनानुसार आंबलेल्या भातामध्ये ताज्या भाताच्या तुलनेत रेझिस्टंट स्टार्चचे प्रमाण लक्षणीयरीत्या जास्त आढळते.
फर्मेंटेशनदरम्यान लॅक्टिक अॅसिड बॅक्टेरिया सक्रिय होतात, जे जड कर्बोदकांचे सोप्या स्वरूपात रूपांतर करतात. त्यामुळे शिळी चपाती आणि शिळा भात पचायला हलके ठरतात. यामध्ये आहारातील तंतू (डायटरी फायबर) वाढल्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि पोट फुगणे कमी होते.
आंबवण्याच्या प्रक्रियेमुळे अन्नातील फायटेट्ससारखे अँटी-न्यूट्रिएंट्स कमी होतात. त्यामुळे लोह, झिंक आणि कॅल्शियम यांसारख्या खनिजांचे शोषण अधिक चांगल्या प्रकारे होते. तसेच बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे आणि काही आवश्यक अमिनो अॅसिड्सचे प्रमाणही वाढते, जे चयापचय आणि प्रतिकारशक्तीसाठी उपयुक्त आहेत.
शिळी चपाती आणि शिळा भात यांचा ग्लायसेमिक इंडेक्स तुलनेने कमी असतो. त्यामुळे रक्तातील साखर हळूहळू वाढते, जे मधुमेहींसाठी फायदेशीर ठरू शकते. रेझिस्टंट स्टार्च पोट भरल्यासारखी भावना निर्माण करतो, त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणास मदत होते.
उन्हाळ्यात ग्रामीण भागात शिळी चपाती पाणी किंवा दुधात भिजवून खाण्याची परंपरा आहे. यामुळे शरीराला थंडावा मिळतो, पाण्याची कमतरता भरून निघते आणि उष्णतेमुळे होणारा त्रास कमी होतो.
शिळी चपाती किंवा शिळा भात नेहमी स्वच्छ, हवाबंद भांड्यात ठेवावा आणि १२–१५ तासांच्या आतच सेवन करावा. आंबट वास, बुरशी, किंवा विचित्र पोत दिसल्यास असे अन्न अजिबात खाऊ नये. काही लोकांना फर्मेंटेड अन्नामुळे त्रास होऊ शकतो, त्यामुळे वैयक्तिक प्रकृतीनुसार काळजी घेणे आवश्यक आहे.
हा लेख केवळ सामान्य माहिती देण्यासाठी आहे. येथे दिलेली माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. मधुमेह, पचनाचे विकार, मूत्रपिंडाचे आजार किंवा इतर कोणतीही आरोग्यविषयक समस्या असल्यास शिळी चपाती किंवा शिळा भात सेवन करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अन्नाची साठवण स्वच्छ व योग्य नसेल तर आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.