जल संकटावर मात करण्यासाठी लोकसहभाग अन् वॉटर बजेटची गरज : डॉ.नितीन वाघमोडे

जल संकटावर मात करण्यासाठी लोकसहभाग अन् वॉटर बजेटची गरज : डॉ.नितीन वाघमोडे
  • Positive News
  • मे 16 2026

Share on  

जल संकटावर मात करण्यासाठी लोकसहभाग अन् वॉटर बजेटची गरज : डॉ.नितीन वाघमोडे

वसंत व्याख्यानमालेत मांडला जलक्रांतीचा प्रवास

नाशिक : देशाची लोकसंख्या आणि पाण्याची उपलब्धता  यामध्ये मोठी तफावत आहे. ही तफावत दूर करण्यासाठी लोकसहभागातून व शास्त्रोक्त पद्धतीने काम होणे गरजेचे आहे. त्याच बरोबर या क्षेत्रात 'वॉटर बजेट' ही अत्यंत महत्वाची बाब आहे. असे प्रतिपादन पुणे येथील आयकर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे यांनी येथे केले.

वसंत व्याख्यानमालेत ते स्व. द. गें. खैरणार (गुरुजी) स्मृती व्याखानात 'पाणी संकट : आजची वस्तुस्थिती आणि उद्याची जबाबदारी, लोकसहभागातून जलक्रांती' या विषयावर बोलत होते. जयंत खैरणार, राजेंद्र खैरणार, सुनंदा महाजन, डॉ. संदीप पाटील  व्यासपीठावर उपस्थित होते. सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते स्व. खैरणार गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. प्रा. संगीता बाफणा यांनी परिचय करून दिला.
दरम्यान, चित्र प्रदर्शनाच्या शृंखलेत आज शौनक देव या विद्यार्थ्याच्या चित्रकृती मांडण्यात आल्या. विविध विषय आणि शैलीत शौनक ने रेखाटलेल्या चित्रांचे कलारसिक व जाणकार नाशिककरांनी भरभरून कौतुक करत या उदयोन्मुख कलाकाराला प्रोत्साहित केले. त्याला पाहुण्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व वृक्ष रोप देऊन गौरवण्यात आले. डॉ. वाघमोडे म्हणाले की, जीवनात पाण्याचे महत्त्व आत्यंतिक आहे. विशेषतः लोकसहभागातून हाती घेतलेले कोणतेही काम सहज पूर्णत्वास जाऊ शकते. आमचा माणदेश किंवा महाबळेश्वर परिसर सर्वाधिक पावसासाठी प्रसिध्द आहे. त्याचवेळी पिण्याच्या आणि सिंचनासाठीच्या पाण्याचे येथे प्रचंड दुर्भिक्ष आहे. ही परिस्थिती बदलण्याच्या काळात आम्ही अण्णा हजारे किंवा पोपटराव पवार यांची कामे बघितली, त्यातून प्रेरणा घेऊन नियोजनबद्ध काम सुरू केले आहे. असे सांगत त्यांनी देशाची एकुण लोकसंख्या आणि पाण्याची उपलब्धता याबाबतची आकडेवारी मांडत जल संकटाची आजची परिस्थिती विशद केली. ते म्हणाले की, पाणी उपसण्याच्या  आपल्या सवयी, प्रदूषण, औद्योगिक वाढ ही आपल्यापुढे आव्हाने आहेत. त्यामुळे या अनुषंगाने मोठ्या जागृतीची आणि प्रत्यक्ष कामाची गरज असल्याचे सांगत त्यांनी या क्षेत्रात केलेल्या कामाचा प्रवास उलगडून दाखवला. त्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष कामाचे दाखलेही दिले. वाटर बजेट हे केवळ ग्रामीण भागातच नव्हे, तर शहरांतही गरजेचे आहे. तसेच आपण पाणी वापरतानाही योग्य नियोजन केले पाहिजे, असेही ते म्हणाले. कारण पाणी आणि झाडं नसल्याने प्रचंड उष्णता वाढत असल्याचे सांगून त्यांनी पावसाळ्यात पडणारे पाणी साठविणे आणि त्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि ग्रे वॉटर रिसायकलिंग यासारखे उपाय महत्वाचे ठरत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
---
*आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'सितार सिम्फनी*
व्याखानानंतर रात्री उशिरापर्यंत इंडोस्टेज क्रियेषण प्रॉडक्शन प्रस्तुत 'सितार सिम्फनी' हा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सितार वादक पंडित रवि चारी यांचा अत्यंत दर्जेदार असा सतारवादनाचा कार्यक्रम झाला. पंडित  चारी यांनी विविध रागांवर आधारित कला सादर केली. त्यांना प्रथमेश चारी (ड्रम), शशांक प्रभु (तबला), प्रशांत वाव्हळ (की बोर्ड) यांनी साथसंगत केली. या कार्यक्रमात रसिक नाशिककरांनी मंत्रमुग्ध होऊन आनंद लुटला.
---
*आजचे (दि. 16) व्याख्यान*
1) वक्ते : अजित रानडे (व्यवसाय सल्लागार आणि सामाजिक उद्योजक, जर्मनी)
विषय : नवीन करारानंतर बदलता युरोप आणि महाराष्ट्रातील तरुण व उद्योजकांसाठी युरोपातील संधी 
2) सरगम सुगम संगीत विद्यालय, नाशिक प्रस्तुत 'तोच चंद्रमा नभात' (सादरकर्ते : विवेक केळकर)
3) चित्रप्रदर्शन : कलानिकेतन महाविद्यालय, नाशिक

संबंधित बातम्या