शाळेत एकदा गुरुजींनी निबंधाचा विषय दिला — “आईच्या पदरावर”.
एका विद्यार्थ्यानं फक्त एवढंच लिहिलं — “आईच्या पदरावर.”
हे शब्द वाचले की मनात एक गहिवर दाटतो, डोळ्यात पाणी येतं… कारण आईचा पदर म्हणजे केवळ साडीचा कापडाचा तुकडा नाही, तर तिच्या ममतेचं, त्यागाचं, आणि संरक्षणाचं प्रतीक आहे.
आईचा पदर चुलीवरून गरम भांडी उतरवताना तिच्या हातांचं संरक्षण करतो.
मुलांचे घाम, अश्रू, घाण झालेले कान, तोंड पुसताना आईचा पदरच तिचा पहिला हाताशी येणारा आधार असतो.
मुलं जेवून झाल्यावर पदराने तोंड पुसण्यात एक वेगळाच मायेचा स्पर्श असतो.
डोळ्यात काही गेले की, आई पदराचं छोटं गोळं करून त्यावर फुंकर मारून डोळ्यावर ठेवते — आणि दुखणं जादूसारखं थांबतं.
झोपताना मुलांना तिची कुशी गादीसारखी आणि पदर चादरीसारखा भासतो.
थंडी, पाऊस, वारा काहीही असो — आईचा पदर मुलांना लपेटून सुरक्षित ठेवतो.
अनोळखी पाहुणा घरी आला की मुलं पदरामागे लपतात, लाजल्यावर चेहरा झाकतात, आणि बाहेर जाताना पदर घट्ट धरून ठेवतात.
त्यांना वाटतं — आईचा पदर हातात आहे म्हणजे संपूर्ण जग आपल्यासोबत आहे.
आई पदराला गाठ मारून वस्तू सापडाव्यात म्हणून आठवण ठेवते.
त्याच पदरात चॉकलेट, प्रसाद, जाबूक, फुलं, धान्य सगळं बांधून आणते.
पदर म्हणजे एक चालतंफिरतं बँक लॉकर — जिथून कधी नशिबाने गोड बक्षीसही मिळतं.
आईचा पदर ही केवळ साडीचा भाग नाही, तर तिच्या मातृत्वाची सावली, तिच्या प्रेमाची उब आणि तिच्या त्यागाची आठवण आहे.
आजची पिढी कदाचित ही जादू समजू शकणार नाही — पण ज्यांनी ती अनुभवल्येय, त्यांच्या हृदयात हा पदर कायम गुंफलेला आहे.
एका शब्दात सांगायचं तर —
आई असते जन्माची शिदोरी, पुरतही नाही आणि ऊरतही नाही…