खरवड :सौ. योजनगंधा जोशी,

खरवड :सौ. योजनगंधा जोशी,
  • Positive News
  • जुलै 6 2025

Share on  

 

खरवड :सौ. योजनगंधा जोशी,
सोलापूर

एक छान लेख.जरूर वाचा.तुम्हाला काय वाटते?

आई गं.. मला भूक लागली आहे, उपीट दे ना खायला. असे म्हणताच मी माझ्या लेकीला डिशमध्ये उपीट वाढले. वाढताना कढईला राहिलेली खरवडही थोडी खरडून वाढावी म्हंटले, पण इतक्यात ती म्हणाली, एं आई.. ते खाली लागलेले नको देऊ हां.
 मी म्हंटले, अगं ते काही करपलेले नसते. खाऊन तर बघ. किती छान लागते ते. तू उपीट सोडून खरवडच खात राहशील. असे म्हणत असताना मला लहानपणीचे दिवस आठवले. रात्रीचा शिळा भात सकाळी आईने परतून दिल्यानंतर कढईला जी खरपूस छान खरवड रहायची, त्यासाठी माझी आणि माझ्या बाबांची भांडणे असायची. उपीटाचेही तसेच. ती खरवड खाण्यासाठी आमचा जीव जायचा. अहो एवढंच काय! लोणी कढवल्यानंतर राहिलेली बेरी तीही आम्ही खरडून खरडून चाटून पुसून खायचो. सायीचे पातेले, त्यात चहा गाळून गोडसर झालेली साय आम्ही चट्टामट्टा करायचो. उन्हाळ्यात आई कुरडया, सालपापड्या करायची. त्यांचीही पातेली आम्ही शेवटी खाऊन लख्ख करायचो. किती साधे पदार्थ! पण त्यातली गोडी, त्यातला आनंद खूप वेगळाच असायचा.
पण काळाच्या ओघात या आवडीनिवडी बदलल्या. आजच्या मुलांना तर या गोष्टी माहित देखील नाहीत. पिझ्झा, बर्गर, मॅगी आणि असल्या बेचव पदार्थांमध्ये चव शोधण्याच्या नादात खऱ्या पदार्थांची चव घेण्याचा आनंद मुले खरंच विसरत चालली आहेत. 
अर्थात पूर्वीची भांडी ही जरमनची, तांब्या-पितळेची, लोखंडाची असायची. त्यामुळे कोणताही पदार्थ करताना तो त्या भांड्याला थोड्या प्रमाणात तरी चिकटला जाऊन त्याची खरपूस खरवड खायला मिळायची. पण आत्ताची भांडीच मुळात निर्लेपची, नॉनस्टिकची आहेत. यामध्ये काहीही पदार्थ केला तरी तो खाऊन संपल्यानंतरही ते भांडे तसेच कोरडे ठणठणीत राहते. त्या पदार्थाचा अंशही त्या भांड्याला चिकटलेला नसतो, तिथे ही स्वर्गीय सुखाचा आनंद देणारी खरपूस खरवड तर लांबच राहिली. आणि हा विचार मनामध्ये करत करतच मला सहज असं वाटून गेलं की, अहो! भांड्यांचं आणि पदार्थांचे काय घेऊन बसलात? पण काळाच्या ओघात माणसांचेही तसेच झालेला आहे, नाही का? 
पूर्वी जरमन, तांब्या-पितळेच्या, लोखंडाच्या भांड्यातील शिजवलेले अन्नपदार्थ खाऊन, ती खरपूस खरवड खाऊन लोकांचे स्वभावही त्या भांड्यांप्रमाणे, त्यातील पदार्थांप्रमाणे व्हायचे. एकमेकांना लावून घेणे, एकमेकांवर निर्व्याज प्रेम करणे, ती आत्मीयता, तो आपलेपणा आपसूकच या सर्वांमधून माणसांमध्ये उतरायचा.
 पण काळ पुढे सरकत गेला. घरच्या बाईच्या हाताला कष्ट नकोत म्हणून जुन्या भांड्यांची जागा निर्लेपच्या, नाँनस्टिकच्या भांड्यांनी घेतली. आणि भांड्यांबरोबरच नातीही निर्लेपची, नॉनस्टिकची झाली. निर्लेप- कुठलाही लेप नाही, नॉनस्टिक- चिकटवून घेण्‍याची, लावून घेण्याची वृत्ती नाही. मग अशा भांड्यातील अन्न खाऊन वृत्तीही तशीच निर्लेप, नॉनस्टिक झाली. मी आणि माझे या ही व्यतिरिक्त काही जग असते, हे या आजच्या मुलांना कसे कळणार? अशी खंत मनात दाटून आली, आणि कढईत राहिलेली खरवड जरा दटावूनच मी माझ्या मुलीला खायला वाढली. तिनेही माझ्या आग्रहाखातर एक घास खाल्ला आणि तिचे डोळे आनंदाने
चमकले. उरलेली सगळी खरवड उपीटासह आनंदाने पोटात गेली. मग मात्र तृप्तीचा ढेकर आला, तिलाही आणि मलाही.....


 

संबंधित बातम्या