केटीएचएम महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय काँटम इयरनिमित्त परिसंवाद
Positive News
जानेवारी 7 2026
Share on
केटीएचएम महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय काँटम इयरनिमित्त परिसंवाद
नाशिक : आजचे जग वेगाने डिजिटल होत असून, कृत्रिम बुद्धिमत्ता, बिग डेटा, सायबर सुरक्षा, हवामान बदल, औषधनिर्मिती यांसारख्या क्षेत्रांतील समस्या अधिक जटिल होत चालल्या आहेत. पारंपरिक संगणकांची गणनाशक्ती या गुंतागुंतीच्या समस्यांवर मर्यादित ठरत आहे. अशा परिस्थितीत अतिवेगवान आणि अचूक गणना करू शकणारी काँटम कम्प्युटिंग ही काळाची गरज बनली आहे, असे मत आंध्रप्रदेश येथील एसआरएम विद्यापीठाचे डॉ. रणजीत थापा यांनी व्यक्त केले.
मविप्रच्या केटीएचएम महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागातर्फे इंटरनॅशनल काँटम वर्षानिमित्त आयोजित ऑनलाइन परिसंवादात ते बोलत होते. याप्रसंगी भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एस.आर. गडाख यांनी कार्यक्रमाची रूपरेषा विशद केली, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय काँटम वर्ष याचे महत्त्व सांगून भौतिकशास्त्र विभाग राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. केटीएचएमचे उपप्राचार्य डॉ. एन. डी.गायकवाड यांनी परिसंवादातून असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या.
डॉ. थापा यांनी क्लासिकल कम्प्युटर आणि काँटम कम्प्युटर यातील व बीट आणि क्युबिट यातील फरक सांगितला. क्युबिटमुळे कम्प्युटरची स्टोरिंग कॅपॅसिटी प्रोसेसिंग कॅपॅसिटी प्रचंड प्रमाणामध्ये वाढणार आहे, त्याचप्रमाणे त्यासाठी असलेले गणितीय सूत्रे व सिमुलेशन याबद्दलही माहिती दिली. भारतामध्ये सुरू असणारा काँटम कम्प्युटिंगचा रिसर्च व जगामध्ये सुरू असलेला रिसर्च याची माहिती दिली. डॉ. थापा यांनी सांगितले कि, काँटम कम्प्युटिंगमध्ये ‘क्यूबिट’ या संकल्पनेमुळे माहिती एकाच वेळी अनेक स्थितींमध्ये प्रक्रिया करता येते, त्यामुळे अत्यंत अवघड गणिते कमी वेळेत सोडवणे शक्य होते. संशोधन, विज्ञान आणि तंत्रज्ञानातील पुढील झेप घेण्यासाठी हे तंत्रज्ञान अपरिहार्य ठरणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमासाठी उपप्राचार्य एस. आर. शिरसाट व प्रा. एस.के. मराठे उपस्थित होते. परिसंवादात १४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्नेहा बुवा यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. गणेश मोगल यांनी आभार मानले.
चौकट
जागतिक बदल अन् नवी आव्हाने
काँटम कम्प्युटिंगच्या प्रभावामुळे आरोग्य, औषधनिर्मिती, अंतराळ संशोधन, हवामान अंदाज, वित्तीय सेवा आणि सायबर सुरक्षेत क्रांतिकारी बदल घडून येणार आहेत. नव्या औषधांचा शोध वेगाने लागेल, रोगनिदान अधिक अचूक होईल, वाहतूक व पुरवठा साखळी अधिक कार्यक्षम बनेल. एकूणच, काँटम कम्प्युटिंगमुळे मानवाच्या विचारक्षमता आणि तंत्रज्ञानाची मर्यादा नव्याने ठरवली जाईल व जग अधिक वेगवान, अचूक आणि बुद्धिमान दिशेने वाटचाल करेल, असा दावाही डॉ. थापा यांनी यावेळी केला.
फोटो कॅप्शन
नाशिक : मविप्रच्या केटीएचएम महाविद्यालयातर्फे इंटरनॅशनल काँटम वर्षानिमित्त आयोजित ऑनलाइन परिसंवादात मार्गदर्शन करताना आंध्रप्रदेश येथील एसआरएम विद्यापीठाचे डॉ. रणजीत थापा