गीता आणि ज्ञानेश्वरी

गीता आणि ज्ञानेश्वरी
  • Positive News
  • जुलै 24 2025

Share on  

गीता आणि ज्ञानेश्वरी

"गीता आणि ज्ञानेश्वरी यात काय फरक आहे?"

ज्ञानेश्वरी गीतेपेक्षा अलीकडची असल्याने, अधिक विस्तृत आहे त्यामुळे संकल्पना अधिक स्पष्ट होतात आणि मनाला अधिक तृप्तता येते. ज्ञानेश्वरी वाचनाने वेगळा दृष्टिकोन गवसतो.

भुंगा आणि कमळ म्हटले की आठवते ते कमळातील मधाचा मोह झाल्याने भुंगा रात्रभर कमळात अडकून पडतो.

गीता सांगते की अपेक्षा हे दुःखाचे मूळ कारण आहे. आणि कोणत्याही गोष्टीचा अर्थ लावताना सर्व बाजूने विचार कसा करावा ते ज्ञानेश्वरी सांगते.
 
लाकूड पोखरणाऱ्या भुंग्याला कमळ पोखरणे शक्य नाही का ? पण लाकूड आणि कमळ यातील भेद तो जाणतो. रात्र सरेल, सकाळ झाली की पाकळ्या उमलतील आणि आपण मुक्त होऊ, हे त्याला माहीत असते. 

जी गोष्ट आपोआप होणार आहे, त्यासाठी विनाकारण कष्ट घ्यायचे, अस्वस्थ व्हायचे कारण नाही. काही कर्म करावी लागतात, तर काही साध्य होण्यासाठी योग्य वेळ यावी लागते. काही वेळा कष्ट घ्यावे लागतात तर काही वेळा धीर धरावा लागतो. कृती आणि संयम यापैकी कधी काय करायचे, ते कळणे म्हणजे ज्ञान. गीतेचा कृतीवर भर आहे, तर ज्ञानेश्वरीचा संयमावर, सद्विवेक बुद्धीवर.
 
ज्या कमळातील मकरंद खाल्ला, त्याला छेद देणे अयोग्य आहे, कमळाच्या कोमल सहवासात राहणे, सकाळ झाली की निघून जाणे, जास्त संयुक्तिक आहे हे भ्रमर जाणतो.

न पोखरणे ही कृतज्ञता आणि उमलण्याची वाट पाहून निघून जाणे ही अलिप्तता,
 
ध्यान करावे हे गीता सांगते, का करावे हे ज्ञानेश्वरी सांगते. 

माणूस एखाद्या शब्दाचा काय अर्थ घेईल, हे त्याच्या धारणाशक्तीवर अवलंबून असते. म्हणून बाह्य जगाकडे लक्ष न देता स्वतःच्या प्रेरणेकडे लक्ष द्यावे, हे ज्ञानेश्वरी वाचून कळते. 
गीता बुद्धीला खाद्य पुरवते आणि ज्ञानेश्वरी मनाला ताब्यात ठेवायला शिकवते. 
पूर्ण टाळून मनाने त्याचा विचार करण्यापेक्षा थोडा अनुभव घेऊन मनाने अलिप्त व्हावे, हे ज्ञानेश्वरी सांगते. 
कृतीपेक्षा कल्पना माणसाला जास्त अधोगतीला नेते.
 
गीता भक्ती शिकवते. डोळ्यांना दिसते त्यावरून, एकच बाजू जाणून निष्कर्ष काढू नये, ही सबुरी ज्ञानेश्वरी वाचतांना येते.

गीता वाचली की, अहंकार सुखावतो. ज्ञानेश्वरी वाचल्यावर आपल्याला काहीच माहीत नाही, ही जाणीव होते. शब्द वाचता येतात पण अर्थ कळण्यासाठी ज्ञानेश्वरी वाचावी लागते.

गीता शास्त्र आहे तर ज्ञानेश्वरी त्याचा वापर कसा करायचा ते सांगते.

सकारात्मक विचार करायला गीता शिकवते. नम्र रहायला ज्ञानेश्वरी शिकवते. 

"काय करावे" ते गीता सांगते. "कसे करावे" हे ज्ञानेश्वरी वाचून कळते.

राम कृष्ण हरी
 

संबंधित बातम्या