शासकीय वाहन असतानाही ‘पिंक ई-रिक्षा’तून कार्यालयात; जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचा पर्यावरणपूरक उपक्रम!
नाशिक : पर्यावरण संरक्षण आणि महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देत नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी एक अनोखा निर्णय घेतला आहे. सोमवारी सकाळी त्यांनी आपल्या शासकीय वाहनाऐवजी पिंक ई-रिक्षातून जिल्हाधिकारी निवास ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत प्रवास केला. या उपक्रमाचे नाशिककरांकडून मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे.
महिन्यातून किमान एक दिवस वाहन न वापरण्याचा निर्णय घेतलेल्या शर्मा यांनी या वेळी महिला चालक वैष्णवी साखरे यांच्या पिंक ई-रिक्षातून प्रवास केला. त्यांनी वैष्णवी यांच्याशी संवाद साधत महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने राबवलेल्या “पिंक ई-रिक्षा योजना”च्या अंमलबजावणीबाबत समाधान व्यक्त केले. या योजनेंतर्गत जिल्ह्यात एक हजार महिलांना ई-रिक्षा देण्याचे नियोजन आहे.
शर्मा यांनी सांगितले, “पर्यावरण संवर्धन ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. महिन्यातील पहिल्या सोमवारी वाहन न वापरण्याचा निर्णय हा केवळ प्रतीकात्मक नाही, तर प्रदूषण कमी करणे, इंधन बचत आणि जनजागृती वाढवणे ही त्यामागील उद्दिष्टे आहेत.”
अलिकडेच त्यांनी चामार लेणी येथे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला होता. “चला जाणू या नदीला” आणि “नदी प्रदूषण निर्मूलन” अशा उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो.
शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि नवीन उपक्रम राबवून नागरिकांना वेळेवर सुविधा उपलब्ध करून देणे या कार्याबद्दल त्यांचा नागरी सेवा दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे सत्कार करण्यात आला होता. तसेच “एक जिल्हा – एक उत्पादन” या योजनेची यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल त्यांचा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला होता.
पिंक रिक्षातून प्रवास करण्याची संधी मिळाल्याने वैष्णवी साखरे यांनी आनंद व्यक्त करत सांगितले, “हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या रिक्षेतून प्रवास केल्याने मनोबल दुप्पट झाले.”
जलज शर्मा यांचा ‘ग्रीन ड्राइव्ह’ उपक्रम — पर्यावरण संवर्धन आणि महिलासक्षमीकरणाचा आदर्श संगम!