दोन तासाचा प्रवास काही मिनिटात , बदलापूरवासियांचे मेट्रोचे स्वप्न लवकरच पूर्ण
मुंबई : मुंबई आणि बदलापूरला मेट्रोने जोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो १४ मार्गिका प्रस्तावित केली असून ३८ किमीची ही मार्गिका आता लवकरच मार्गी लागणार आहे. मेट्रो १४ मार्गिकेच्या पर्यावरणीय प्रभाव अहवाल तयार करण्यासह वन आणि पर्यावरणासंबंधीची मंजुरी घेण्याची प्रक्रिया पार पाडण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे.
सल्लागाराच्या नियुक्तीसाठी बुधवारी एमएमआरडीएकडून निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. सल्लागाराची नियुक्ती आणि पुढील कार्यवाही करून वर्षभरात मेट्रो १४ मार्गिकेच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई, मिरा-भाईंदर, ठाणेवासियांपाठोपाठ बदलापूरवासियांचेही मेट्रोचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होईल.
दोन तासाचा प्रवास काही मिनिटात होणार
एमएमआरडीएच्या ३३७ किमीच्या मेट्रो मार्गिकेतील १४ मेट्रो मार्गिकेचे काम केव्हा सुरु होणार याची प्रतीक्षा बदलापूरवासियांना होती. कारण ही मेट्रो मार्गिका थेट मुंबई आणि बदलापूरला जोडणार आहे. त्यामुळे ही मार्गिका सेवेत दाखल झाल्यास दीड ते दोन तासांचा प्रवास काही मिनिटांत होणार असल्याने ही मार्गिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
ही मार्गिका प्रत्यक्षात मार्गी लावण्याच्यासाठी एमएमआरडीएने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. मेट्रो १४ मार्गिकेसाठी मिलान मेट्रो या कंपनीने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. या अहवालास आयआयटी मुंबईची मान्यताही मिळाली आहे. आता येत्या काही दिवसांतच हा अहवाल अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. राज्य सरकारने अहवालास मान्यता दिल्यास प्रत्यक्ष बांधकामासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण करून बांधकामास सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.