३३९९ कोटींचा सर्वात मोठा रेल्वे प्रकल्प; हजारो लोकांना रोजगार मिळणार
केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील भारतीय रेल्वेच्या मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी दिली. या प्रकल्पांमुळे प्रवास सुविधा वाढणार आहे. तसेच लॉजिस्टिक खर्च कमी होईल, तेल आयात घटेल व कार्बन उत्सर्जन कमी होऊन शाश्वत रेल्वे परिचालनाला बळ मिळणार आहे. 3,399 कोटींचा हा प्रकल्प आहे.
या प्रकल्पामुळे भारतीय रेल्वेचे सध्याचे जाळे सुमारे 176 किमीने वाढणार आहे. यामुळे सुमारे 19.74 लाख लोकसंख्या असलेल्या सुमारे 784 गावांशी दळणवळण वाढणार आहे. यामुळे बांधकामाच्या कालावधीत सुमारे 74 लाख मानवी दिवसांचा थेट रोजगार निर्माण होणार आहे.
भारतीय रेल्वेच्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आज प्रवासी आणि मालवाहतूक सुरळीत आणि जलद गतीने व्हावी, यासाठी भारतीय रेल्वेच्या दोन मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी दिली. रतलाम- नागदा तिसरा व चौथा मार्ग आणि वर्धा- बल्हारशाह चौथा मार्ग असा हा प्रकल्प आहे.