शंभर वर्षे जगण्याचा मूलमंत्र म्हणजे 'आरोग्य स्वराज्य' : डॉ. अभय बंग

शंभर वर्षे जगण्याचा मूलमंत्र म्हणजे 'आरोग्य स्वराज्य' : डॉ. अभय बंग
  • Positive News
  • मे 5 2026

Share on  

शंभर वर्षे जगण्याचा मूलमंत्र म्हणजे 'आरोग्य स्वराज्य' : डॉ. अभय बंग 

वसंत व्याख्यानमालेत आरोग्याची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन 

नाशिक :  जो स्वमध्ये स्थित आहे तो स्वस्थ अर्थात निरोगी ही भारतातील आरोग्याची व्याख्या आहे. म्हणजेच आरोग्याच्या बाबतीत जो इतरांवर विसंबून असतो तो अस्वस्थ असतो. याचाच अर्थ असा की आम्हा सर्वांना आरोग्य स्वराज्य हवे आहे. तरच आपण शंभर वर्षे जगु शकतो. असे प्रतिपादन गडचिरोली येथील सर्च ग्रामचे संचालक पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी येथे केले.

गोदाघाटावरील देवमामलेदार यशवंत महाराज पटांगणावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेच्या 103 व्या ज्ञानयज्ञात डॉ. बंग यांनी सोमवारी चौथे पुष्प गुंफले. त्यावेळी डॉ. वसंतराव पवार स्मृती व्याख्यानात ते 'आरोग्य- स्वराज्य : शंभर वर्षे जगण्याची कला' या विषयावर बोलत होते. डॉ. प्रणव पवार, प्रायोजक सह्याद्री फार्मचे सीईओ सचिन वाळुंज, प्रख्यात उद्योजक अशोक बंग व्यासपीठावर उपस्थित होते. सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते दिवंगत माजी खासदार डॉ. वसंतराव पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 
व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.
सुरूवातीलाच सर्वांना उद्देशून 'मी शंभर वर्षे जगेन का ? असा प्रश्न करून डॉ. बंग म्हणाले की, या प्रश्नाची दोनच उत्तरं असू शकतात. होय किंवा नाही. युधिष्ठर आणि यक्ष यांच्यातील संवादाचा उल्लेख करून त्यांनी वैज्ञानिक प्रगतीचा ओझरता आढावा घेतला. त्यातून त्यांनी शंभर वर्षे जगण्यामागचा वैज्ञानिक दृष्टिकोनही यावेळी स्पष्ट केला. व्यंकी रामकृष्ण यांच्या पुस्तकाचा दाखला देत त्यांनी अत्यंत ओघवत्या शैलीत विविध रोग आणि लोकांच्या जीवनशैलीवरही भाष्य केले. पुर्वीचे संसर्गजन्य रोग आणि आताचे संस्कृतीजन्य रोग याचेही यथोचित विवेचन त्यांनी केले. ते म्हणाले की आपण सगळेच आपल्या शरीरात एक ना एक रोग पाळत आहोत. कदाचित यामुळेच आपल्या देशात दरवर्षी जवळपास 5 कोटी लोक आरोग्यावरील खर्चामुळे गरिबी रेषेच्या खाली ढकलले जात असल्याचा अंदाज वर्ल्ड बँकेने वर्तविला आहे. अशावेळी शंभर वर्षे जगण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आरोग्य स्वराज्य होय. म्हणजेच आपण निरोगी आयुष्य जगण्याचा संकल्प केला पाहिजे. जगात सर्वाधिक मृत्यू हे बालपणी (बालमृत्यू) आणि म्हातारपणी (हृदयरोग) होतात. याचेही काही दाखले देत डॉ. बंग यांनी यावर करावयाच्या उपचारांचीही चर्चा केली. गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम जिल्ह्यात साधारण 30 वर्षांपूर्वी आलेले विदारक अनुभव कथन करत त्यांनी घरोघरी नवजात बालक योजनेचा व सर्च ग्राम संस्थेचा प्रवासही विषद केला.

बहारदार सूर- संगम
व्याख्यानानंतर श्रेयसी- संदीप- चेतन प्रस्तुत 'सूर संगम' हा सुमधुर हिंदी - मराठी गाण्यांचा बहारदार कार्यक्रम झाला. यामध्ये श्रेयसी राय, संदिप थाटसिंगार व चेतन थाटसिंगार यांनी आपल्या मखमली आवाजात गाणी सादर केली. त्यांना जितेंद्र सोनवणे, सुशील केदारे व तेजस देवरे यांनी संगीत साथ केली. या कार्यक्रमास उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
---
आजचे (दि. 5) व्याख्यान

1) वक्ते : डॉ. मारुती पवार 
विषय : तुटलेल्या वाटांपासून अमर्याद स्वप्नांपर्यंत 
2) सागर कुलकर्णी प्रस्तुत 'नाट्य-भाव-भक्ती'
3) श्री. रामभाऊ डोंगरे यांचे चित्रप्रदर्शन

संबंधित बातम्या