वसंत व्याख्यानमालेत 'सत्यशोधक' विचारांचा जागर
नाशिक : विचार वेगळे असले तरी संवाद तुटता कामा नये. म. फुले यांच्या अनुषंगाने अनेक मतभेद आहेत, किंवा पसरवले गेले आहेत. प्रत्यक्षात फुले यांनी केवळ अनेक बाबींचा निषेधच केला नाही, तर संपूर्ण आयुष्यात प्रत्येक वेळी वेगळा कृती कार्यक्रम दिला. असे प्रतिपादन अहिल्यानगर येथील सुभाष वारे यांनी येथे केले.
गोदाघाटावरील देवमामलेदार यशवंत महाराज पटांगणावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेत बुधवारी क्रांतिसूर्य म. ज्योतिबा फुले यांच्या द्वीशताब्दी जयंती वर्षानिमित्त आयोजित, अँड. द. तु. जायभावे स्मृती व्याख्यानात 'सत्यशोधक बनु या, आनंदाने जगु या' या विषयावर ते बोलत होते. जयंत जायभावे, शेफालीताई भुजबळ, जयंत खडताळे, व्यासपीठावर उपस्थित होते. सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते क्रांतिसूर्य म. ज्योतिबा फूले यांच्या अर्ध पुतळ्याचे व अँड. द. तु. जायभावे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे ठकसेन गोराणे यांनी श्री. वारे यांचा सत्कार केला. व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. दरम्यान, यंदापासून नव्याने सुरू करण्यात आलेल्या उपक्रमात व्याख्यानस्थळी दिपक वर्मा यांचे चित्र प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनाला रसिक नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिला.
तत्कालीन परिस्थिती आणि पार्श्वभूमीचा यथोचित उल्लेख करून श्री. वारे म्हणाले की, विधवांचे प्रश्न असो की महिलांच्या शिक्षणाचा विषय असो, म. फुले यांनी धडाधडीने पुढाकार घेतल्याचे आढळते. या संपुर्ण परिस्थितीचे प्रतिबिंब आणि म. फुले यांचे विद्रोही व्यक्तिमत्व आदी बाबी आपल्याला त्यांच्या 'गुलामगिरी' या ग्रंथात आढळतात. त्यांच्या पेहरावावरुन ते जास्त शिकलेले नसावेत, असे वाटत असले तरी त्यांचे इंग्रजीचे ज्ञान आणि वाचन, अभ्यासातून मिळवलेल्या जाणिवा प्रचंड व्यापक होत्या, असे सांगताना त्यांनी रेनेसन्स चळवळीच्या अभ्यासाचे उदाहरण दिले. त्याचप्रमाणे विषयाच्या अनुषंगाने त्यांनी दर्यावर्दी वास्को दी गामा आणि कोलंबस यांच्याबाबतची कथाही वर्णन केली. या सर्वांचा अर्थ एकच की चर्च सांगते तेच सत्य नाही, तर त्या पलीकडेही मोठा विचार जगात आहेत, ही विचारसरणी पुढे आल्याचे त्यांनी सांगितले आणि त्या माध्यमातुन त्यांनी तत्कालीन परिस्थिती आणि म. फुले यांच्या सत्यशोधकी विचारांचा आढावा घेतला.
---
*सुनहरी यादेंमध्ये श्रोते तल्लीन*
व्याख्यानानंतर आयआरएफएम प्रस्तुत 'सुनहरी यादें' हा चित्रपट सृष्टीच्या सुवर्ण काळातील गाजलेल्या हिंदी गितांचा रंगतदार कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमात खऱ्या अर्थाने तल्लीन झालेल्या श्रोत्यांनी मनमुराद आनंद लुटला. ज्ञानेश वर्मा व मनिषा विसपूते यांनी खुमासदार शैलीत निवेदन केले. तर आयएफआरएम ग्रुपच्या गायक- गायिकांनी सुमधुर आवाजात जुन्या आठवणींना उजाळा दिला.
---
*आजचे (दि. 7) व्याख्यान*
1) वक्ते : श्री. अमितकुमार नाफडे
विषय : ग्रामीण भारत घडविताना : गावापासून राष्ट्रनिर्मितीकडे
2) सुरभी गौड प्रस्तुत 'एव्हरग्रीन हिटस्'
3) कु. पलक आसिफ तांबोळी यांचे चित्रप्रदर्शन.