जिओची शेअर बाजारात धमाकेदार एन्ट्री, गुंतवणूकदार मालामाल, किती रुपयांवर लिस्टिंग?

जिओची शेअर बाजारात धमाकेदार एन्ट्री, गुंतवणूकदार मालामाल, किती रुपयांवर लिस्टिंग?
  • Positive News
  • ऑक्टोबर 29 2026

Share on  

जिओची शेअर बाजारात धमाकेदार एन्ट्री, गुंतवणूकदार मालामाल, किती रुपयांवर लिस्टिंग?


JIO IPO Listing : शेअर बाजारातील गुंतवणूकदार ज्या क्षणाची गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर आज आला आहे. देशातील सर्वात मोठा मानला जाणारा सुमारे ३०,२०० कोटी रुपयांचा आयपीओ आणल्यानंतर आज सकाळी १० वाजता जिओ प्लॅटफॉर्म्सने शेअर बाजारात अधिकृतपणे एन्ट्री केली आहे. 

लिस्टिंगच्या अवघ्या काही तास आधी जागतिक दर्जाची ब्रोकरेज फर्म 'नोमुरा'ने जिओ प्लॅटफॉर्म्सवर आपला विश्वास दाखवत त्याला 'बाय' (Buy) रेटिंग दिली दिली. तसेच प्रति शेअर १,३४० रुपये इतके लक्ष्य (Target Price) निश्चित केले आहे. नोमुराच्या मते, जिओ ही आता केवळ टेलिकॉम क्षेत्रातील बदलाचे केंद्र राहिलेली नसून, ती स्वतःच्या क्षेत्रातील आघाडीची आणि मजबूत कंपनी बनली आहे.

किती रुपयांवर झाली लिस्टिंग?

आयपीओपूर्वी या कंपनीत रिलायन्स इंडस्ट्रीजची ६६.४३ टक्के भागिदारी होती. तर मेटा (Meta) आणि गुगल (Google) कडे अनुक्रमे ९.९८ टक्के आणि ७.७३ टक्के भागभांडवल आहे. आज बाजारात लिस्टिंगच्या वेळी हा शेअर गुंतवणूकदारांना किती परतावा देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जिओ प्लॅटफॉर्मचा शेअर आज स्टॉक मार्केटमध्ये २१ टक्क्यांच्या प्रीमियमसह लिस्ट झाली.

कंपनीची जबरदस्त कामगिरी

कंपनीची आर्थिक कामगिरी अत्यंत भक्कम राहिली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये जिओ प्लॅटफॉर्म्सचा महसूल (Revenue from Operations) १४.६ टक्क्यांनी वाढून १.४७ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर कंपनीचा निव्वळ नफा (Net Profit) १५.१ टक्क्यांनी वाढून ३०,०४९ कोटी रुपये झाला आहे. कंपनीचा EBITDA १८.८ टक्क्यांनी वाढून ७६,२५५ कोटी रुपयांवर पोहोचला असून EBITDA मार्जिन ५१.९ टक्के नोंदवले गेले आहे.

जिओवर संपूर्ण देशाचा आशिर्वाद, अनंत अंबानींनी व्यक्त केली कृतज्ञता

"माझ्यासाठी व्यवसाय ही एक प्रकारची उपासना आहे; संपूर्ण देशाने जिओवर (Jio) आपल्या आशीर्वादांचा वर्षाव केला आहे," असे अनंत अंबानी यांनी जिओ प्लॅटफॉर्म्सच्या लिस्टिंग सोहळ्यात म्हटले. या प्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की, व्यवसाय म्हणजे उपासना आहे आणि प्रत्येक उपासनेची सांगता 'प्रसाद' अर्पण करून होते. त्यांनी नमूद केले की, आज शेअर बाजारात वाजवलेली घंटा ही मंदिरातील घंटेसारखी आहे आणि जिओला संपूर्ण देशापर्यंत पोहोचवणे म्हणजे 'प्रसाद' वाटण्यासारखेच आहे. या महत्त्वपूर्ण क्षणी, अनंत यांनी जिओवर विश्वास ठेवणाऱ्या लाखो लोकांचे आभार मानले.

संबंधित बातम्या