उदंचन जलविद्युत प्रकल्पांमध्ये ₹57,260 कोटींची गुंतवणूक!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाजनको, महाजनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड, व अवाडा ग्रुप यांच्यामध्ये उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी सामंजस्य करार करण्यात आले. या करारांच्या माध्यमातून 8,905 मेगावॅट वीजनिर्मिती, ₹57,260 कोटींची गुंतवणूक आणि 9200 रोजगार संधी निर्माण होणार आहेत.
महाजनकोच्या माध्यमातून घाटघर (125 मेगावॅट), कोडाळी (220 मेगावॅट), वरसगाव (1200 मेगावॅट) व पानशेत (1600 मेगावॅट) येथे प्रकल्प उभारले जातील. महाजनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडकडून मुतखेड (110 मेगावॅट), निवे (1200 मेगावॅट) व वरंढघाट (800 मेगावॅट) येथे तर अवादा अॅक्वा बॅटरीजकडून पवना फल्याण (2400 मेगावॅट) व सिरसाळा (1250 मेगावॅट) येथे प्रकल्प उभारले जातील.
मुख्यमंत्री म्हणाले, “उदंचन जलविद्युत प्रकल्प हे अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान असून, त्याद्वारे शेती, उद्योग व व्यावसायिक गरजांची पूर्तता होईल आणि पर्यावरण रक्षणालाही चालना मिळेल. राज्याच्या ऊर्जा क्षमतेपैकी 50% अपारंपरिक स्त्रोतांतून निर्माण करण्याचा शासनाचा मानस आहे.”
यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री गिरीश महाजन आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.