कसे बनले इंदूर भारतातील स्वच्छ शहर ....
मध्य प्रदेशचे इंदूर हे शहर सलग 7 वेळा स्वच्छ सर्वेक्षणात भारतातील पहिला क्रमांक मिळवणारे एकमेव शहर आहे. या शहराने असं काय केलं आणि इथल्या नागरिकांनी प्रशासनाला कसा हातभार लावला आहे हे थोडक्यात पाहुयात....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महिन्यांपूर्वी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना मतदारसंघात सर्वोत्तम विकासकामे करण्यासाठी इंदूरचा अभ्यास दौरा करण्याचा सल्ला दिला होता.
दूर महापालिकेने लोकांमध्ये जाऊन कचऱ्याच्या बाबत एक प्रबोधन केलं आहे. घराघरातील कचऱ्याचे 6 भागात वर्गीकरण केलं जातं. यावर दंडात्मक कारवाई आहे पण तत्पूर्वी इथल्या प्रशासनाने तेवढी सेवा सुद्धा तत्परतेने दिली आहे.
कचऱ्याच्या गाड्यांवर लक्ष ठेवण्यासाठी कंट्रोल रूम
इंदूर शहरात इंटिग्रेटेड सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट सेंटर या ठिकाणी स्मार्ट सिटी अंतर्गत एक कमांड सेंटर उभारण्यात आलेलं आहे. या ठिकाणी कचरा गोळा करण्यासाठी शहरातील 470 पेक्षा अधिक वाहनांवर एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाते. 25 पेक्षा अधिक कर्मचारी या कमांड सेंटरमध्ये काम करतात. काम करत असलेल्या कर्मचाऱ्याला प्रत्येक व्हॅनचा मार्ग माहित असतो. गाडीचा वाहक कोण आहे, ती व्हॅन नेमकी कधी थांबते, कचरा गोळा करायला किती वेळ लावते तसेच ती गाडी वेळेत पोहचली आहे का अशा अनेक गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक वाहनाला जी पी एस ट्रॅकर बसवले आहेत. 2018 मध्ये या कमांड सेंटर काम सुरू झाले. कोणत्याही मार्गावर बिघाड, रस्ता बंद असल्यास किंवा चालकाची तब्येत ठीक नसल्यास याबाबत सुद्धा माहिती या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मिळते.
इंदूर शहरात दररोज स्वच्छतेचे सर्वेक्षण
महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि येथील नागरिकांच्या सहकार्यामुळेच इंदूर सलग 7 वेळा देशातील सर्वात स्वच्छ शहर बनले आहे, असं प्रतिपादन इंदूरचे महापालिका आयुक्त शिवम वर्मा यांनी केलं आहे. वर्मा म्हणाले, शहरातील प्रत्येक घरातून कचऱ्याचे वर्गीकरण केलं जातं त्यानंतर ते गोळा होऊन पुढे त्या त्या प्रकारच्या प्रकल्पांमध्ये जाऊन त्यावर कार्यवाही केली जाते. फक्त शहरातच नव्हे तर अगदी झोपडपट्टीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने नागरिकांची कचऱ्याबद्दल भूमिका स्पष्ट आहे.
शहर स्वच्छ राहावे यासाठी जसे अनेक संस्था सर्वेक्षण करतात तसं आमच्याकडून दररोज शहराचे सर्वेक्षण केलं जातं. फक्त कचऱ्याचे नाही तर रस्त्यावर सुशोभिकरण, समाज प्रबोधन याबाबत अनेक उपायोजना आम्ही राबवतो, असं ही ते म्हणाले. रस्त्यांवर थुंकणाऱ्या नागरिकांकडून प्रत्येक महिन्याला 3 लाख रुपये दंड वसूल केला जात असल्याची माहिती सुद्धा आयुक्तांनी यावेळी दिली.