20 विद्यार्थी नवोदय विद्यालयात अन शिक्षकाला दिली पल्सर गाडीची भेट ...
अहिल्यानगर जिल्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सौंदाळा या शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम पाहायला मिळाला. इयत्ता पाचवीच्या वर्गाचे वर्गशिक्षक रवींद्र पागिरे यांच्या वर्गातील तब्बल पाच विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालय साठी निवड तसेच इतर 15 ते 20 विद्यार्थ्यांनी विविध खाजगी व शासकीय स्पर्धा परीक्षेत उत्तुंग यश मिळवले.त्यामुळे सर्व पालकांनी रवींद्र पागिरे यांना बजाज पल्सर ही सुमारे एक लाख वीस हजार रुपये किमतीची गाडी भेट म्हणून दिली.दरवर्षीच नवोदय विद्यालयात पागिरे सरांचे विद्यार्थी निवड होत असतात. सन 2018 पासून आतापर्यंत जवळपास 20 विद्यार्थ्यांना त्यांनी नवोदय विद्यालयात शिक्षणासाठी पाठवले आहे.
याप्रसंगी पालकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की गेल्या एक एप्रिल पासून पागिरे सरांनी विद्यार्थ्यांचे नवोदय शिष्यवृत्तीचे जादा तास घेतले. तसेच मागील उन्हाळ्यात सरांनी एक दिवसही सुट्टी घेतली नाही. तसेच मागच्या 13 मे रोजी सरांचा अपघात झाला असतानाही सर दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांचा जादा तास घेण्यासाठी शाळेत उपस्थित होते.
विद्यार्थ्यांप्रती असलेल्या कर्तव्य भावना तसेच आपल्या स्वतःच्या कौटुंबिक व इतर वेळाची परवा न करता शाळेसाठी योगदान देणाऱ्या या शिक्षकाला वर्गातील विद्यार्थी व पालकांकडून मिळालेली ही अनमोल भेटवस्तू चर्चेचा विषय ठरत आहे.
या प्रसंगी कार्यक्रमासाठी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड हे अध्यक्षस्थानी तर सौंदळा गावचे सरपंच व इतर मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी पाचवीच्या पालकांनी शाळेतील सर्व शिक्षकांना भेटवस्तू देऊन सन्मान केला.
यावेळी पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने गटशिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी रुकसाना शेख, केंद्रप्रमुख कडू पाटील, मुख्याध्यापक घुले, सरपंच शरद आरगडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रेखा आरगडे, ग्रामपंचायत सदस्य बबन आरगडे, उपसरपंच गणेश आरगडे, तृप्ती मापारी, मनीषा काळे, गणेश घुले, अशोक कोठुळे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.