डॉ अंजली जाधव,ठाणे
ठाणे : मानसिक स्वास्थ्यासाठी सकारात्मक गप्पा गरजेच्या
गप्पा मारल्यामुळे मन मोकळे होते, तणाव कमी होतो पण त्यामध्ये इतरांची निंदा न करता चांगल्या गोष्टीबद्दल चर्चा व्हावी. माणसाला आपले मन मोकळे करायला आवडते, आपल्या भावना व्यक्त करायला आवडतात त्यामुळे गप्पा या गरजेच्याच असतात. पण गप्पा मारताना कुणाच्याही वैयक्तिक जीवनाबद्दल बोलू नये, कोणालाही भावनिक दृष्ट्या दुखवू नये, गप्पा मारताना जर हेतू चांगला असेल तर गप्पा ही चांगल्याच होतात त्यामुळे आपला हेतू कसा आहे याकडे आधी लक्ष दिले पाहिजे. आपण गप्पा मारताना एकमेकांशी आपल्याला माहीत असलेल्या आणि सर्वांना उपयोगी पडतील अशा इन्फॉर्मेशन शेअर कराव्यात, उदाहरणार्थ एखादा पदार्थ आरोग्यासाठी कसा चांगला असतो किंवा व्यायामाबद्दल किंवा मानसिक स्वास्थ्य चांगले राहावे यासाठी आपण काय करावे अशा प्रकारच्या गप्पा जर आपण मारल्या तर सर्वांचा त्यातून फायदा होतो, आणि जेव्हा पण आपण चांगल्या गोष्टी बोलत असतो तेव्हा तुमचे सबकॉन्शियस माईंड त्याची नोंद करत असते. जर तुम्ही चांगले अनुभव शेअर करत राहिलात तर तुमचे सबकॉन्शियस माईंड त्याची नोंद करते आणि तुम्ही जर का कोणाची निंदा करत राहिलात तर तुमचे सबकॉन्शिअस माईंड त्याचीही नोंद करते.
असं म्हणतात की तुमचं सब कॉन्शियस माईंड म्हणजेच चित्रगुप्ताची डायरी, ते तुमचे कार्मिक अकाउंट. कार्मिक अकाउंट हा शब्द सध्या सर्वांना खूप सहजपणे समजतो . आपल्या कार्मिक अकाउंटला चांगल्या गोष्टी सेव्ह झाल्या तर आपले पुढचे आयुष्य नक्कीच सुखकर होते, पुढच्या जन्माबद्दल मी काही बोलू इच्छित नाही. बऱ्याच वेळेला असं होतं की गप्पा मारताना जी व्यक्ती अनुपस्थित आहे त्या व्यक्तीविषयी वाईट बोलले जाते, त्या व्यक्तीच्या चुका डिस्कस केल्या जातात, एखाद्या व्यक्तीबद्दल काही चुकीचे घडले असेल तर त्याबद्दल चर्चा केली जाते. असे न करता आपण फक्त चांगल्या गोष्टींबद्दल बोललो तर त्या आपल्या गप्पा ह्या निरोगी गप्पा या सदरात मोडू शकतात.
एखाद्या विषयावर चर्चा करताना फक्त मला च सर्व विषयातील जास्त नॉलेज आहे असे दाखवून इतरांना कमी लेखू नका. प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या विषयातले उत्तम ज्ञान असू शकते हे लक्षात घ्या. चर्चा करताना कधी कधी उत्तम श्रोता बनण्याचा प्रयत्न करा.
एखादी व्यक्ती स्वतःच्या वाईट किंवा दुःखद अनुभवाबद्दल सांगत असेल तर त्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करा, त्या व्यक्तीला धीर देण्याचा प्रयत्न करा. एखाद्या व्यक्तीबद्दल काही चांगले घडले असेल तर त्याचे भरभरून कौतुक करा. दुसऱ्याचे कौतुक जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमचा मेंदू तुमच्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह हार्मोन्स निर्माण करतो आणि जेव्हा तुम्ही एखाद्या बद्दल वाईट बोलता तेव्हा तुमचा मेंदू स्ट्रेस हार्मोन्स निर्माण करतो. मग आता बघा की तुमचा फायदा नक्की कशात आहे? बऱ्याच वेळा असं होतं की काही मैत्रिणींचा किंवा काही मित्रांचा ग्रुप असतो आणि हे मी बोलते आहे ते वयाच्या पन्नाशीनंतर च्या व्यक्तींबद्दल कारण या वयामध्ये बऱ्याच वेळेला लोक खूप लवकर हळवे होतात, दुःखी होतात, गैरसमज करून घेतात तर अशा व्यक्तींच्या मध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून कधी कधी गैरसमज होतात. मग ते गैरसमज कोणी दूर करायचे? मी आधी का बोलू? तिने किंवा त्याने आधी बोलले पाहिजे, किंवा मीच का माघार घेऊ अशा भावना जोर धरत असतात. हा कदाचित त्यांच्या वयाचा परिणाम असतो कारण या वयामध्ये भीती, दुःख अशा भावनांचा अतिरेक आपल्या मनामध्ये होत असतो. तर अशावेळी ग्रुप मध्ये असलेल्या इतर लोकांनी त्या दोन व्यक्तींमध्ये सुसंवाद कसा होईल यावर भर दिला पाहिजे .
तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो तुम्ही तुमचे चांगले ग्रुप टिकवून ठेवा, वरचेवर तुमच्यामध्ये कशा गप्पा होतील यावरती भर द्या, कामानिमित्ताने समक्ष भेटता नाही आले तर कधी कधी व्हिडिओ कॉल वरती बोला, मधून अधून छोट्या छोट्या पिकनिक ठरवा, सिनेमाला, जा एकमेकांच्या घरी चहा नाश्त्याला किंवा जेवणाला जा . आणि तुमचे हे आनंदी आयुष्य सुखाने जगत रहा.
गप्पा या जरुरीच आहेत परंतु त्यामध्ये सुसंवाद असावा गॉसिप अजिबात नसावे.
लक्षात ठेवा आनंदी मन हे निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली असते .