*आदर्श शिक्षक रविंद्र बारकू पाटील :- प्राचार्य प्रशांत पाटील*

*आदर्श शिक्षक रविंद्र बारकू पाटील :- प्राचार्य प्रशांत पाटील*
  • Positive News
  • जुलै 1 2026

Share on  

*आदर्श शिक्षक रविंद्र बारकू पाटील :- प्राचार्य प्रशांत पाटील*

आदर्श शिक्षक, रविंद्र बारकू पाटील, मागील महिन्यात सेवानिवृत्त झाले. रविंद्र पाटील सरांच्या नोकरीला सुरुवात 1989 ला झाली. सहा वर्ष सिन्नर तालुक्यात, सहा वर्ष येवला तालुक्यात तर 2002 पासून निवृत्तीपर्यंत इगतपुरी तालुक्यातील खैरगाव, उंबरकोन , वाकी आणि कावनाई येथे त्यांची सेवा झाली. 
नोकरीच्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या कार्याचा वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवला. सिन्नर तालुक्यातील शिंदेवाडी पंचाळे येथील शाळेत त्यांनी 250 वृक्षांची लागवड करून ती जगवली. देशात भूकंप व पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात त्यांनी मदत फेरी काढून तेथे मदत पोहोचवली. आसाम मधील वादळग्रस्त नागरिकांना केलेल्या मदतीबद्दल त्यांना आसामच्या मुख्यमंत्र्यांचे आभाराचे पत्र प्राप्त झाले. 
येवला तालुक्यात स्मार्ट पीटीच्या प्रश्नमंजुषेत त्यांनी द्वितीय क्रमांक मिळवला व त्यावेळी आमदार कल्याणराव पाटील यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले होते. 
रविंद्र पाटील सर इगतपुरी तालुक्यातील खैरगाव शाळेत कार्यरत असताना त्यांच्या १४ विद्यार्थ्यांना गणित संबोध परीक्षेत विशेष प्राविण्य प्राप्त झाले होते .
2003 साली ते इगतपुरी तालुक्यातील उंबरकोन येथे पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत असताना तेथील वर्गखोल्यांना  लोकवर्गणीतून फ्लोरिंग लावून, त्यांनी शाळा सारवण्याचा विषय कायम स्वरुपी मार्गे लावला. येथेच मेलझोन संस्थेमार्फत आंतरराष्ट्रीय बाल आनंद मेळाव्यासाठी आठ विद्यार्थ्यांची विक्रमगड येथे निवड करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात सहभागी होण्याकरता ते नेहमी कार्यरत असत तसेच सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत. त्याचमुळे या शाळेतील त्यांच्या विद्यार्थ्यांना खो-खो व सांस्कृतिक स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळाला होता.
आतापर्यंत त्यांच्या 20 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती स्पर्धेत तसेच नवोदय विद्यालयात निवड झाली आहे. माजी विद्यार्थ्यांचा शाळेतील विकासात सहभाग वाढवण्यासाठी ते नियमितपणे माजी विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम आयोजित करीत .
त्यांच्याच कार्यकाळात काननाई शाळेत IDBI बँकेमार्फत दोन लाख रुपये किमतीचा इंटरऍक्टिव्ह पॅनल प्राप्त झाला. तसेच एक लाख 90 हजार रुपयांचे शाळेला शेड बांधून मिळाले. त्यांच्या कार्यकाळात वाकी शाळेत HDFC बँकेमार्फत अडीच लाख रुपयांचे स्वच्छतागृह बांधून मिळाले तसेच अनेक सामाजिक संस्थांमार्फत मुलांना शैक्षणिक साहित्य प्राप्त झाले.
सरांचा सांस्कृतिक तसेच साहित्यिक कार्यक्रमांमध्ये नेहमीच सहभाग असतो. गेले पंचवीस वर्ष इगतपुरी तालुक्यात आयोजित साहित्य संमेलनाच्या आयोजनात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. ते नियमितपणे सामाजिक विषयात लिखाण करीत असतात त्यांचे दीड हजारापेक्षा जास्त पत्रे सकाळ, लोकमत, गावकरी तसेच विविध वर्तमानपत्रात प्रकाशित झाले आहेत. विविध दिवाळी अंकातून त्यांच्या कविता चारोळी नियमित प्रकाशित होत असतात. शिक्षकांकरता आयोजित तालुका स्तरीय, जिल्हास्तरीय तसेच राज्यस्तरीय प्रशिक्षणात त्यांनी तज्ञशिक्षक म्हणून केली तीस वर्ष मार्गदर्शन केले आहे. संपूर्ण आयुष्यभर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा यासारख्या विविध परीक्षांच्या तयारीसाठी त्यांनी मार्गदर्शन केले. 
*सरांना आतापर्यंत विविध सामाजिक संस्था तर्फे 100 पेक्षा जास्त पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 2008- 09 वर्षातील शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे.*
विविध कार्यक्रमांमध्ये कार्यक्रम सूत्रसंचालनाचे काम ते करीत असतात .
त्यांच्या सुविद्य सौभाग्यवती आदर्श शिक्षिका विद्या रविंद्र पाटील यांचा विविध उपक्रमात संपूर्ण आयुष्यभर त्यांना पाठिंबा राहिला. त्यांचा मुलगा आयुर्वेदात पोस्ट ग्रॅज्युएट झाला असून महात्मा नगर परिसरात त्याने वैद्यकीय व्यवसाय सुरू केला आहे. कन्या शिक्षण घेत आहे. सरांनी आपल्या कुटुंबाला शिक्षणात अग्रेसर ठेवताना संपूर्ण आयुष्यभर ग्रामीण, आदिवासी भागातील मुलांच्या शैक्षणिक प्रगती करता प्रयत्न केले. क्रीडा, साहित्य ,सांस्कृतिक कार्यक्रम यात कार्य करून वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवला. दीर्घउद्योगी, निर्व्यसनी, काटकसरी वागण्यातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमात उत्तम काम केले. सरांनी आपले आरोग्य उत्तम सांभाळले आहे. निवृत्तीनंतरही ते विविध क्षेत्रात कार्यरत राहून समाज उपयोगी कार्य करतील यात काही शंका नाही. सरांना पुढील आयुष्या करिता शुभेच्छा...!!!

संबंधित बातम्या