जळगावनंतर बऱ्हाणपूरच्या केळीला 'जीआय' बहुमान! जागतिक बाजारपेठेत मिळणार नवी ओळख!

जळगावनंतर बऱ्हाणपूरच्या केळीला 'जीआय' बहुमान! जागतिक बाजारपेठेत मिळणार नवी ओळख!
  • Positive News
  • जून 30 2026

Share on  

जळगावनंतर बऱ्हाणपूरच्या केळीला 'जीआय' बहुमान! जागतिक बाजारपेठेत मिळणार नवी ओळख!


जळगाव : जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या केळीला यापूर्वीच ‘भौगोलिक निर्देशांक’ (जीआय टॅग) प्राप्त झाला आहे. त्यानंतर आता बऱ्हाणपूरच्या केळीला हा बहुमान मिळाला असून, मध्य प्रदेशासाठी तो अत्यंत अभिमानाचा क्षण मानला जात आहे. 

या मान्यतेमुळे बऱ्हाणपूरच्या केळीला राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण ओळख मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच हजारो केळी उत्पादक शेतकऱ्यांना अधिक चांगला मोबदला, विस्तारित बाजारपेठ आणि निर्यातीच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दीर्घ पाठपुराव्यानंतर मिळाले यश

केळीला जीआय टॅग मिळाल्यानंतर मध्य प्रदेशच्या माजी मंत्री व आमदार अर्चना चिटणीस यांनी समाधान व्यक्त करत बऱ्हाणपूरच्या सुपीक मातीत कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमांचा हा सन्मान असल्याचे म्हटले आहे. २०१३-१४ मध्ये उद्यानिकी मंत्री म्हणून कार्यरत असताना बऱ्हाणपूरच्या केळीला तिच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्तेच्या आधारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्याच काळात जीआय टॅगसाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आली आणि विविध विभाग, तज्ज्ञ संस्था तसेच शेतकरी यांच्या सहकार्याने सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, बऱ्हाणपूरची केळी आता राज्यातील प्रतिष्ठित जीआय टॅग प्राप्त उत्पादनांच्या यादीत समाविष्ट झाल्याचे आमदार चिटणीस यांनी म्हटले आहे.

गुणवत्तेमुळे आधीच वेगळी ओळख

उत्कृष्ट गुणवत्ता, गोड चव, आकर्षक आकार आणि भरघोस उत्पादन क्षमतेमुळे बऱ्हाणपूरच्या केळीने देशातील अनेक राज्यांमध्ये आधीच आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आता जीआय टॅग मिळाल्यामुळे या उत्पादनाला कायदेशीर संरक्षण मिळणार असून, बनावट उत्पादनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. याशिवाय देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेथील केळीची ब्रँड व्हॅल्यू वाढण्याची शक्यता असून, त्याचा थेट लाभ स्थानिक शेतकऱ्यांना होणार आहे.

निर्यात, गुंतवणुकीला मिळणार चालना

बऱ्हाणपूर जिल्ह्यातील हजारो शेतकरी केळी लागवडीवर अवलंबून आहेत. सुपीक जमीन, अनुकूल हवामान आणि आधुनिक फलोत्पादन तंत्रज्ञानामुळे तिथे उच्च प्रतीची केळी उत्पादित केली जाते. जीआय टॅगमुळे या उत्पादनाला स्वतंत्र ओळख मिळाल्याने निर्यात वाढण्याबरोबरच कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीलाही चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

जीआय उत्पादनांमध्ये आणखी भर

मध्य प्रदेशातील वैशिष्ट्यपूर्ण कृषी आणि पारंपरिक उत्पादनांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. बालाघाटचा प्रसिद्ध चिन्नौर तांदूळ, महेश्वरची जगप्रसिद्ध महेश्वरी साडी आणि हरदाच्या बांबू या उत्पादनांनंतर आता बऱ्हाणपूरच्या केळीचीही या प्रतिष्ठित यादीत भर पडली आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातील जीआय टॅग प्राप्त उत्पादनांची संख्या वाढली असून, राज्याच्या कृषी व हस्तकला क्षेत्राला नवी ओळख मिळत आहे.

‘लोकल टू ग्लोबल’ संकल्पनेला बळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘व्होकल फॉर लोकल’ आणि ‘लोकल टू ग्लोबल’ या संकल्पनेच्या अनुषंगाने स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारही शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि स्थानिक उत्पादनांना जागतिक दर्जा मिळवून देण्यासाठी विविध उपक्रम राबवत असल्याचे अर्चना चिटणीस यांनी नमूद केले.

संबंधित बातम्या