भारताच्या जंगलात 4000 किमीवरून कसे पोहोचले ओरंगुटान?एक-एकाची किंमत 20 लाख; वन विभागाला वेगळाच संशय!

भारताच्या जंगलात 4000 किमीवरून कसे पोहोचले ओरंगुटान?एक-एकाची किंमत 20 लाख; वन विभागाला वेगळाच संशय!
  • Positive News
  • सप्टेंबर 10 2026

Share on  

भारताच्या जंगलात 4000 किमीवरून कसे पोहोचले ओरंगुटान?एक-एकाची किंमत 20 लाख; वन विभागाला वेगळाच संशय!


भुवनेश्वर : ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बिचित्रपूर जंगलात पाच लहान ओरंगुटान सापडल्यानं वन विभागाचे अधिकारी चकित झाले आहेत. ८ सप्टेंबरला बदापई गावाच्या जवळ असलेल्या जंगलात ओरंगुटान आढळून आले. 

स्थानिकांची याची माहिती वन विभागाला दिली. यानंतर वन विभागाच्या पथकानं त्यांना सुरक्षित पकडून आपल्या देखरेखीखाली ठेवलं. त्यांची किंमत २० ते २५ लाखांच्या घरात आहे.

पाच ओरंगुटान बालासोरमध्ये कसे पोहोचले, हा प्रश्न आहे. ओरंगुटान भारतीय जंगलांमध्ये आढळून येत नाहीत. आग्नेय आशियातील बोर्नियो आणि सुमात्रा बेटांवरील जंगलांमध्ये ओरंगुटान वास्तव्यास आहेत. हे जंगल बालासोरपासून जवळपास ४ हजार किलोमीटरवर आहे. त्यामुळे ५ ओरंगुटान बालासोरमध्ये स्वत: आलेले नाहीत ही बाब स्पष्ट आहे. या प्राण्यांना कोणीतरी बाहेरून आणलं आणि जंगलात सोडलं असण्याची दाट शक्यता आहे. वन विभागाला तशी शंका आहे. अवैध तस्करीचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र याला अद्याप तरी दुजोरा मिळालेला नाही.

ओरंगुटान जगात कुठे कुठे सापडतात?

ओरंगुटान आता जंगलात केवळ बोर्नियो आणि सुमात्रा बेटांवर आढळून येतात. यांच्या तीन प्रमुख प्रजाती आहेत- बोर्नियन, सुमात्रन आणि तनापुली ओरंगुटान. जंगलांमध्ये सध्याच्या घडीला केवळ १.१९ लाख ओरंगुटानच शिल्लक आहेत. यामध्ये १,०४,७०० बोर्नियन, १३,८४६ सुमात्रन आणि ८०० पेक्षा कमी तपानुली ओरंगुटान यांचा समावेश आहे. म्हणजेच तपानुली ओरंगुटान यांची संख्या अतिशय कमी आहे.

ओरंगुटान नामशेष होण्याच्या मार्गावर

ओरंगुटान यांची संख्या पाहता त्यांच्या तिन्ही प्रजातींना धोका आहे. अतिशय धोका असलेल्या प्राण्यांच्या यादीत त्यांचा समावेश होतो. जंगलतोड ही त्यांची संख्या घटण्याचं प्रमुख कारण आहे. शेती आणि पाम तेलासाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड होते. यासोबत अवैध शिकार आणि तस्करीचाही धोका आहे. जंगलांचं प्रमाण कमी होत असल्यानं ओरंगुटान समोर अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

जंगलात लागणारे वणवेदेखील ओरंगुटान यांच्यासाठी धोकादायक ठरले आहेत. विशेषत: १९९७-९८ मध्ये इंडोनेशियात वणवा पेटला होता. त्यात जवळपास ८ हजार ओरंगुटान मारले गेले. बोर्नियन ओरंगुटानचा संख्या त्यावेळी ३३ टक्क्यांनी कमी झाली होती.
 

संबंधित बातम्या