मुंबई :- अलाहाबाद उच्च न्यायालयातून वर्णी लागलेल्या न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायमूर्ती म्हणून बुधवारी शपथ घेतली. न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी हे मुंबई उच्च न्यायालयाचे ५० वे मुख्य न्यायमूर्ती ठरलेत.
लोकभवनात पार पडला शपशविधी -
महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी बुधवारी लोकभवनात पार पडलेल्या कार्यक्रमात न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. या प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह काही कॅबिनेट मंत्रीही उपस्थित होते. या शपथविधीला मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य खंडपीठातील सर्व न्यायमूर्तींनीही सोहळ्याला आवर्जून उपस्थिती लावली होती. अलाहाबाद उच्च न्यायालयातून सेवाज्येष्ठतेनुसार न्यायाधीशपदावर असलेल्या न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांच्या नावाची मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायमूर्ती म्हणून शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने गेल्याच महिन्यात केली होती.
यावेळी लोकभवनातील दरबार हॉल इथं पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्यानंतर मुख्य न्यायमूर्तीपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी स्वीकारल्याबद्दल राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांचं अभिनंदन केलं