रत्नागिरी : महाराष्ट्रातील गावागावांमधील शाळांमध्ये शिक्षणाच्या होत असलेल्या अनावस्थेचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. अभिजीत दिपके यांनीही हा मुद्दा उचलून धरला आहे. आता रत्नागिरी जिल्ह्यातील
निवळी येथील जिल्हा परिषद शाळेत ६२ विद्यार्थी शिक्षण घेत असताना शिक्षकांची कमतरता निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शाळेला तातडीने दोन कायमस्वरूपी शिक्षक मिळावेत, अशी मागणी निवळी ग्रामस्थ, पालक व शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने शिक्षण सभापती नंदा मुरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर तब्बल बहुसंख्य ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
निवळी उपसरपंच संजय निवळकर यांनी निवळीतील जनतेची समस्या घेऊन शिक्षण सभापती नंदा मुरकर यांची भेट घेत शिक्षकांचा प्रश्न मांडला. निवळी शाळेची एकूण विद्यार्थी पटसंख्या ६२ असून इयत्ता पहिली ते चौथीमध्ये ३३, तर इयत्ता पाचवी ते सातवीमध्ये २९ विद्यार्थी आहेत. मात्र, विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत शाळेत शिक्षकांची संख्या अपुरी आहे.
शाळेतील एका शिक्षकाचे वयोमानानुसार सेवानिवृत्ती झाली असून दुसरे शिक्षक प्रशिक्षणासाठी गेल्याने उपलब्ध शिक्षकांवर अतिरिक्त जबाबदारी येत आहे. पहिली ते सातवीपर्यंतच्या ६२ विद्यार्थ्यांना अशा परिस्थितीत अध्यापन कसे करायचे, असा प्रश्न ग्रामस्थ व पालकांनी उपस्थित केला आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी तातडीने दोन शिक्षकांची कायमस्वरूपी नियुक्ती करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या प्रश्नाच्या अनुषंगाने निवळीतील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल शिर्के, उपाध्यक्ष संतोष चव्हाण, तसेच संपदा नितोरे, स्वरांजली गावडे, प्रतीक्षा नितोरे, मनस्वी गावडे, संतोष खापरे आदी सभासद व पालक उपस्थित होते.
शिक्षकांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी शिक्षण सभापती नंदा मुरकर यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ बोलावून घेतले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी येत्या दोन दिवसांत कार्यवाही करून शिक्षक उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांनी दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
दरम्यान, निवळी शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न लक्षात घेऊन शिक्षकांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे. या निवेदनावर ३२ ग्रामस्थांच्या सह्या असून, ग्रामस्थ व पालकांनी एकत्रितपणे शिक्षकांचा प्रश्न उपस्थित केल्याने आता शिक्षण विभागाकडून होणाऱ्या कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिक्षण सभापती नंदा मुरकर यांनी तातडीने दखल घेत कार्यवाहीचे आदेश दिल्याबद्दल निवळी उपसरपंच निवळकर तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.