नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक येथे मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिकच्या कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय, चाचडगांव, ता. दिंडोरीच्या नूतन इमारतीचे उदघाटन व कोनशिला अनावरण केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कर्मवीर रावसाहेब थोरात यांनी सुरू केलेल्या मराठा विद्या प्रसारक समाजचा आज मोठ्या शिक्षणसंस्थेत विस्तार झाला आहे. अवघ्या 5 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या संस्थेत आज 2 लाखांहून अधिक विद्यार्थी आणि 11 हजारांहून अधिक शिक्षक व कर्मचारी आहेत. नाशिक जिल्ह्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक जडणघडणीत या संस्थेचे मोठे योगदान आहे.
नाशिक जिल्हा कृषी क्षेत्रात अग्रेसर आहे. नाशिकमधील शेतकरी मेहनती असून देशाच्या द्राक्ष निर्यातीपैकी 80% निर्यात एकट्या नाशिक जिल्ह्यातून होते. नाशिकचा कांदाही देशभर प्रसिद्ध आहे. शेतीचा वाढता उत्पादन खर्च, अल्पभूधारक शेतकऱ्यांची मर्यादित गुंतवणूक क्षमता आणि बदलती कृषी परिस्थिती लक्षात घेता शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
कृषी क्षेत्रातील संशोधनाला चालना देण्याबरोबरच हे संशोधन प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे. कृषी महाविद्यालयांनी जमिनीचा पोत, खतांचा संतुलित वापर आणि आधुनिक कृषी पद्धतींबाबत शेतकऱ्यांना वैज्ञानिक मार्गदर्शन करावे. कमी खतांचा वापर करून अधिक उत्पादन घेण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.
कृषी महाविद्यालयांतील प्रयोग व संशोधन शेतापर्यंत पोहोचले पाहिजे. शेतकऱ्यांच्या मुलांनी कृषी शिक्षण घेऊन शेतीला प्रक्रिया उद्योगांशी जोडल्यास कृषी क्षेत्राभोवती मोठी अर्थव्यवस्था उभी राहू शकते. राज्य सरकारने 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026'च्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली आहे. मात्र शेतकऱ्यांना कर्जाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी कर्जमुक्तीबरोबरच नव्या तंत्रज्ञानावर आधारित व्यवस्था उभी करणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
तसेच, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या विविध अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल. शालेय शिक्षण विभागामार्फत 30 हजार शिक्षक आणि 5 हजार कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी मंत्री गिरीष महाजन, मंत्री दादाजी भुसे, मंत्री नरहरी झिरवाळ, मंत्री छगन भुजबळ व इतर मान्यवर उपस्थित होते.