नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज नागपूर येथे बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या कामांसंदर्भात आढावा बैठक पार पडली.
बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री फडणवीस यांनी गोरेवाडा प्रकल्पाची पाहणी करून विविध कामांचा सविस्तर आढावा घेतला. आफ्रिकन सफारी सुरू करण्यासाठी करण्यात येत असलेल्या कामांची सद्यस्थिती, प्रकल्पाची प्रगती आणि सफारी सुरू करण्याचे अपेक्षित वेळापत्रक याबाबत माहिती जाणून घेतली. गोरेवाड्यात सुरू असलेल्या सर्व कामांसाठी निश्चित कालमर्यादा ठरवून त्यानुसार कामांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
आफ्रिकन सफारी हा गोरेवाडा प्रकल्पाच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग असून, त्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा आणि अन्य कामांची पूर्तता कोणत्या टप्प्यावर आहे, याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती जाणून घेतली आणि आफ्रिकन सफारी सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली कामे निश्चित करून त्यांची पूर्तता कालबद्ध पद्धतीने करण्यावर भर देण्याचे निर्देश दिले.
गोरेवाडा प्रकल्पाचा पहिला टप्पा 2021 मध्ये पूर्ण करण्यात आला असून या टप्प्यात वाइल्डलाइफ रेस्क्यू सेंटर, इंडियन सफारी आणि एंट्रन्स प्लाझा यांचा समावेश आहे. यानंतर आता गोरेवाडा प्रकल्पाच्या पुढील विकासासाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात विविध सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे. आफ्रिकन सफारीसह महत्त्वाची कामे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात समाविष्ट आहेत. वॉकिंग ट्रेल, आफ्रिकन सफारी, सफारी प्लाझा, ॲनिमल हॉस्पिटल आणि क्वारंटाईन ब्लॉक यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यातील आफ्रिकन सफारीच्या कामाच्या प्रगतीबाबत माहिती जाणून घेतली. यासह सफारी सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली कामे, त्यांची सद्यस्थिती आणि पुढील नियोजन यांचाही आढावा घेतला आणि आफ्रिकन सफारीच्या कामाला गती देण्याचे निर्देश दिले.
प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात ट्रेल ऑफ सेन्सेस, बायोपार्क, नाईट झू, गोंडवाना पार्क, बायो डिस्कव्हरी प्लाझा आणि ट्रायबल ट्रेल यांचा समावेश आहे. या विविध सुविधांच्या माध्यमातून गोरेवाडा प्रकल्पाचा वन्यजीव पर्यटनासोबतच जैवविविधता, निसर्ग आणि स्थानिक संस्कृतीचा अनुभव देणारे महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याची संकल्पना मांडण्यात आली. प्रकल्पाच्या पुढील विकासासाठी अनुभवी आणि सक्षम सल्लागाराची नियुक्ती करावी, गोरेवाड्याचा विकास करताना दीर्घकालीन पर्यटनाच्या गरजा लक्षात घेऊन नियोजन करावे, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
ताडोबा आणि पेंच येथे येणाऱ्या पर्यटकांनी गोरेवाड्यात 1 ते 2 दिवस पर्यटनासाठी घालवावेत, या दृष्टीने गोरेवाड्याचा विकास करावा. ताडोबा आणि गोरेवाडा या दोन्ही पर्यटनस्थळांना जोडणारे प्रभावी नियोजन करून पर्यटकांचा मुक्काम वाढेल, अशा पद्धतीने सुविधा विकसित कराव्यात. गोरेवाडा प्रकल्पात वन्यजीव पर्यटनासोबत पर्यटकांना विविध अनुभव देणाऱ्या सुविधा विकसित करून विदर्भातील महत्त्वाचे पर्यटन केंद्र म्हणून गोरेवाड्याची ओळख निर्माण करण्यासाठी नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
गोरेवाडा प्राणी उद्यानाची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून पाहणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी प्रकल्पातील विविध सुविधांची आणि सुरू असलेल्या कामांची माहिती जाणून घेत प्रकल्पाच्या पुढील विकासासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
यावेळी मंत्री गणेश नाईक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.