केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, शैक्षणिक सुविधा आणि शासकीय सेवांचा लाभ विनाअडथळा मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांसह नागरिकांनी आपले आधार कार्ड अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे.
विशेषतः ५ आणि १५ वर्षे पूर्ण झालेल्या बालकांचे बायोमेट्रिक अपडेट करणे अनिवार्य असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी सांगितले.
बालकांच्या वयानुसार चेहऱ्याची ठेवण आणि बायोमेट्रिक माहिती बदलत असल्याने ५ व १५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर आधारमधील बायोमेट्रिक माहिती अपडेट करणे गरजेचे आहे. तसेच नाव, जन्मतारीख, पत्ता किंवा मोबाईल क्रमांकात बदल अथवा त्रुटी असल्यास आवश्यक कागदपत्रांच्या आधारे त्यात दुरुस्ती करून घ्यावी.
UIDAIच्या नियमानुसार आवश्यक ओळख व पत्त्याची कागदपत्रेही अद्ययावत करणे आवश्यक आहे.
आधार अपडेट असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, APAAR ID, स्पर्धा परीक्षा तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेणे सुलभ होते.
आधारशी अचूकपणे जोडलेल्या बँक खात्यामध्ये शासकीय योजनांचा लाभ थेट जमा होण्यासही मदत होते.
NEET, JEE यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आणि प्रवेश प्रक्रियेत ओळख पडताळणीदेखील सुलभ होते.
आधारमधील चुकीची किंवा अपूर्ण माहिती ऐनवेळी अडचणी निर्माण करू शकते.
त्यामुळे शैक्षणिक नुकसान आणि अनावश्यक मनस्ताप टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी व पालकांनी वेळेत आधार अपडेट करून घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
शाळा-महाविद्यालयांत विशेष आधार शिबिरे
विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी शाळा व महाविद्यालयांनी जवळच्या अधिकृत आधार केंद्राशी समन्वय साधून विशेष आधार शिबिरांचे आयोजन करावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
पालकांनी ० ते ५ वयोगटातील मुलांची नवीन आधार नोंदणी करून घ्यावी.
तसेच ५ व १५ वर्षे पूर्ण झालेल्या पाल्यांचे अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट तातडीने पूर्ण करावे.
सर्व नागरिकांनीही जवळच्या अधिकृत आधार केंद्रात जाऊन आपली आधार माहिती अद्ययावत करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.