भारत-अमेरिका भागीदारीतून महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती

भारत-अमेरिका भागीदारीतून महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती
  • Positive News
  • ऑगस्ट 19 2026

Share on  

भारत-अमेरिका भागीदारीतून महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स नॅशनल कन्व्हेन्शन 2026’ चे उदघाटन सत्र संपन्न झाले.

भारत-अमेरिका संबंध हे 21 व्या शतकातील निर्णायक भागीदाऱ्यांपैकी एक असून, आता ही भागीदारी धोरणात्मक संवादातून आर्थिक सहकार्याकडे नेण्याची गरज आहे. महाराष्ट्र या नव्या पर्वाच्या केंद्रस्थानी राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

भारत-अमेरिका भागीदारीची व्याप्ती केवळ व्यापार आणि गुंतवणुकीपुरती मर्यादित न ठेवता सहगुंतवणूक, सहनवोन्मेष, सहविकास आणि सहनिर्मिती यावर भर देण्याची गरज आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, युवा मनुष्यबळ, विविध उद्योगक्षेत्र, पायाभूत सुविधा, बाजारपेठ आणि जागतिक संपर्कक्षमता यामुळे पुढील पिढीतील विकासासाठी महाराष्ट्र एक सक्षम व्यासपीठ ठरू शकतो, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, एआय, सेमीकंडक्टर, क्वांटम टेक्नोलॉजी, सायबर सुरक्षा, डेटा सेंटर, प्रगत उत्पादन आणि वैद्यकीय तंत्रज्ञान या क्षेत्रांत भारत-अमेरिका सहकार्याला मोठ्या संधी आहेत. महाराष्ट्र या क्षेत्रांत सहकार्याला चालना देण्यासाठी सज्ज आहे. तसेच महाराष्ट्रात नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळालगत 165 एकर क्षेत्रावर मेडिसिटी विकसित करण्यात येत आहे. जगातील आघाडीची कार्डियाक हेल्थकेअर संस्था Cleveland Clinic या मेडिसिटीमध्ये अँकर हॉस्पिटल म्हणून सहभागी होत आहे. आरोग्यसेवा, मेडटेक आणि संशोधनाचे अत्याधुनिक केंद्र म्हणून मेडिसिटी विकसित करण्याचा राज्याचा प्रयत्न आहे.

मुंबई आणि नवी मुंबई ही भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांमधील महत्त्वाची केंद्रे म्हणून विकसित होत आहेत. देशातील डेटा सेंटर क्षेत्रातील सुमारे 65% क्षमता महाराष्ट्रात आहे. पुढील पिढीतील एआय कंपन्या, एआय पायाभूत सुविधा आणि एआय आधारित सेवा महाराष्ट्रात विकसित व्हाव्यात, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

आगामी काळात एआय, रोबोटिक्स, सेमीकंडक्टर, सायबर सुरक्षा, हेल्थकेअर टेक्नॉलॉजी आणि संशोधनासारख्या नव्या क्षेत्रांत रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्यामुळे गुंतवणूक आणि कौशल्य विकास धोरणांची सांगड घालणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

यावेळी उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) दिनेश प्रताप सिंह, इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष अनुप आचार्य, कार्यकारी उपाध्यक्ष प्रशांत कृष्णन, कार्यकारी उपाध्यक्ष डॉ. उपासना अरोरा व इतर मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या