मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थान, मुंबई येथे महाराष्ट्रातील विविध सेवाभरतींसाठी होणाऱ्या परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात बैठक पार पडली.
महाराष्ट्रात विविध सेवाभरतींसाठी होणाऱ्या परीक्षापद्धतीत सर्वसमावेशक, अधिक सुरक्षित, आणि सर्वसंमत सुधारणा करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी घेतला. ही समिती प्रत्येक महसुली विभागात जाऊन विद्यार्थी, शिक्षण संस्थाचालक आणि संबंधित घटकांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेईल. त्याआधारे राज्यासाठीचे समग्र धोरण निश्चित केले जाईल.
केंद्र सरकारने पेपरफुटीसंदर्भात आणि परीक्षा गैरव्यवहारासंदर्भात संसदेत कायदा केला आहे. महाराष्ट्रातही यासंदर्भात स्वतंत्र कायदा आहे. तथापि, संसदेने केलेला कायदा अधिक कठोर असल्याने तो महाराष्ट्रातही लागू करण्यासंदर्भातील प्रक्रिया येत्या पंधरवड्यात पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच, राज्यात किमान 25,000 सुरक्षित क्लासरूम उभारण्यात याव्यात, असेही निर्देश मुख्यमंत्री यांनी यावेळी दिले.
या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.