मुंबई : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सध्या व्हॉट्सॲपवर एक मेसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, यामध्ये भारत सरकारकडून सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाचे स्पेशल गिफ्ट म्हणून मोफत इंटरनेट डेटा आणि तीन महिन्यांचे फ्री रिचार्ज दिले जात असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, नागरिकांची दिशाभूल करणारा हा एक अत्यंत खतरनाक सायबर घोटाळा (स्कॅम) असल्याचे स्पष्ट झाले असून नागरिकांनी या प्रलोभनाला अजिबात बळी पडू नये, असा गंभीर इशारा सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी दिला आहे.
स्वातंत्र्यदिन किंवा इतर सणासुदीच्या काळात सायबर गुन्हेगार नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी असे आमिष दाखवणारे मेसेज तयार करतात. या व्हायरल मेसेजमध्ये एक बनावट लिंक जोडलेली असते आणि गिफ्ट मिळवण्यासाठी त्यावर क्लिक करण्यास सांगितले जाते. जर कोणी युजरने या लिंकवर क्लिक केले, तर त्यांची वैयक्तिक माहिती जसे की नाव, मोबाईल नंबर आणि बँक तपशील थेट हॅकर्सच्या हाती जाऊ शकतात.
अनेकदा अशा लिंक्स ओपन केल्यामुळे मोबाईलमध्ये मालवेअर किंवा व्हायरस डाऊनलोड होऊन डिव्हाइस हॅक होण्याची दाट शक्यता असते.भारत सरकार किंवा कोणतीही नामांकित दूरसंचार कंपनी अशा प्रकारे व्हॉट्सॲपवर लिंक पाठवून कोणतीही मोफत भेटवस्तू किंवा रिचार्ज कधीच देत नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही खोट्या आणि संशयास्पद लिंकवर अजिबात क्लिक करू नये. तसेच हा मेसेज इतर व्हॉट्सॲप ग्रुप्सवर फॉरवर्ड करणे पूर्णपणे टाळावे आणि आपल्या ओळखीच्या लोकांनाही या सायबर धोक्याविषयी तत्काळ सावध करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.