वडिल : पालकत्वाचा आधारस्तंभ : डॉ. अनिता दौंड.
वडिल दिनाच्या (Father's Day) निमित्ताने, बालमानसोपचार तज्ञ म्हणून मी आज ही वडिलांबद्दल माझी कृतज्ञता लेखातून मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनात, नोकरी/व्यवसायाच्या तणावातून घरात परतणारे वडील, त्यांचे कुटुंबासाठीचे योगदान आणि स्वतःच्या व मुलांच्या मानसिक आरोग्यासाठीची भूमिका ही वडिलांची महत्त्वाची कामगिरी आहे.
एकदा रोहितला (नाव बदलले आहे) शाळेतल्या नाटकात मुख्य भूमिका मिळाली. पहिल्या सरावाच्या दिवशी तो घाबरून होता. वडिलांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून सांगितले: "मी तुझ्यामागे उभा राहीन. चूक झाली तरी घाबरू नकोस विश्वासाने बोल.". प्रयोगाच्या दिवशी वडील पहिल्या रांगेत होते. रोहितने पाहिले तेव्हा त्यांनी हावभावातून त्याची प्रशंसा केली. तो संपूर्ण नाटक आत्मविश्वासाने बोलला. वडिलांची ही केवळ शारीरिक नाही तर भावनिक उपस्थिती होती — जिने मुलाला बळ दिले.
हार्वर्डच्या संशोधनानुसार, ज्या मुलांचे वडील भावनिकदृष्ट्या सक्रिय किंवा उपलब्ध असतात: त्यांचा
- IQ आणि EQ (भावनिक बुद्धांक) २०% जास्त विकसित होतो.
- समस्या सोडवण्याची क्षमता आणि लवचिकता वाढते.
- नातेसंबंधांमध्ये विश्वासाची बीजे पेरली जातात.
तर वडिलांनी भावनिक उपस्थिती कशी निर्माण करावी?
१. "मी तुझ्यासाठी उपलब्ध आहे" हे भावपूर्ण कृतींनी दाखवा जसे प्रत्येक रात्री झोपेआधी १० मिनिटे मुलाच्या पलंगावर बसणे, त्याला विचारणं की, "सांग, आज तुझ्या मनात काय आलं? तु कसा आहेस?"
- महत्त्व: झोपण्या आधीची वेळ फक्त मुलासाठी असावी— त्या वेळी फोन नको, टीव्ही नको.
२. अपयशाला "शिक्षणाची संधी" म्हणून पहा
- समजा, मुलगा क्रिकेट स्पर्धेतून निवडला गेला नाही. तरी बोलावे की, "मला तुझा प्रयत्न पाहून अभिमान वाटतो! उद्या सरावात काय सुधारू शकतो?" असे वडील बोलले तर खूप सकारात्मक परिणाम मुलावर होत असतो.
- अपयशाला न लाजता, ते स्वतःला सुधारणा करण्याचे साधन बनते.
३. आपल्या स्वतःच्या भावनांशी प्रामाणिक राहा
- ऑफिसमधील निराशा घरी आल्यावर लपवू नका. त्यांना सांगा की, "आज खूप कठीण दिवस होता. पण तू जेव्हा हसतोस तेव्हा सर्व काही बरोबर वाटते!"
- अशी भावना व्यक्त केल्यावर, मुलांना समजते की भावना दाखवणे हे सामान्य आहे.
४. छोट्या क्षणांचे महत्त्व समजा
- शाळेच्या बसला जाताना विंडोमधून टाटा बाय करणे, जेवणाच्या टेबलावर एक दिवसभरच्या घटना, किंवा एखादा जोक सांगणे. हसणे, रुसणे, मस्ती करणे. मुलांसोबत काही मैदानी किंवा घरी खेळ खेळणे.
- यातून मुलाला कळते की, "माझ्या वडिलांना मी खूप आवडतो" — या छोट्या कृतींनी भावनिक जोडणी घडते.
-
अंतिम संदेश : तुमची शारीरिक व मानसिक उपस्थिती महत्त्वाची आहे!
प्रिय वडिलहो,
तुम्ही दररोज जे लढत आहात, जो ताण सहन करत आहे, त्याबद्दल खूप आदर. पण लक्षात ठेवा:
"मुलांना हवी असते ती तुमची परिपूर्णता नव्हे, तर तुमची उपस्थिती.
तुमचे डोळ्यातील प्रेम, हाताचा स्पर्श, आणि 'मी तुझ्यासोबत आहे' हा आवाज — हेच त्याच्या जगण्याचे कवच बनतात."*
जेव्हा तुम्ही भावनिकदृष्ट्या उपलब्ध असता, तेव्हा तुमचे मूल:
- जीवनाच्या धकाधकीत अडखळले तरी उठत जाणे शिकते,
- स्वतःवर विश्वास ठेवण्याचे धैर्य मिळवते,
- आयुष्यभर "माझे वडील माझ्यासोबत आहेत" या भावनेने चालते.
तुमची ही अदृश्य पाठीवरची थाप— हाच तुमच्या पालकत्वाचा सर्वात मोठा विजय आहे.
डॉ. अनिता दौंड
बालमानसोपचार तज्ञ नाशिक.
9763182616.