कार्बन-स्मार्ट शेती हा भविष्यातील शाश्वत विकासाचा मार्ग : डॉ. गजानन घोडके

कार्बन-स्मार्ट शेती हा भविष्यातील शाश्वत विकासाचा मार्ग : डॉ. गजानन घोडके
  • Positive News
  • मे 14 2026

Share on  

कार्बन-स्मार्ट शेती हा भविष्यातील शाश्वत विकासाचा मार्ग : डॉ. गजानन घोडके

वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावरून अन्नसुरक्षेच्या भविष्याबाबत चर्चा 

नाशिक : शेतातील समस्या हा केवळ शेतकऱ्याचा प्रश्न नसून, अन्नसुरक्षेच्या अनुषंगाने  एकुणच मानव जातीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे हे प्रश्न सोडविण्यासाठी विज्ञानाची कास धरणे आणि सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. त्यामुळे भविष्यात कार्बन- स्मार्ट शेती हाच शाश्वत भविष्याचा मार्ग आहे. असे प्रतिपादन दक्षिण कोरिया येथील सोल डोंगगुक विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. गजानन घोडके यांनी केले.

वसंत व्याख्यानमालेत स्व. मुळचंदभाई गोठी स्मृती व्याखानात 'कार्बन- स्मार्ट शेती आणि अन्न सुरक्षा : भविष्यातील दिशा' या विषयावर त्यांनी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधला. व्याख्यानमालेचे पदाधिकारी कांतीलाल तातेड यांच्या हस्ते स्व. मुळचंदभाई गोठी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.
दरम्यान, चित्र प्रदर्शनाच्या निमित्ताने आज रसिकांना नाशिकमधील कलानिकेतन महाविद्यालयाच्या जान्हवी दिलीप बढे, साक्षी सागर कुलथे आणि प्रेरणा भालचंद्र गोंदके या विद्यार्थिनींनी रेखाटलेल्या विविध प्रकारच्या कलाकृतींची झलक बघावयास मिळाली. त्यांच्या सुंदर व कल्पक कलाकृती पाहुन सर्वांनी त्यांचे मनःपूर्वक कौतुक केले. त्यांना श्री. तातेड यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. डॉ. घोडके म्हणाले की, आज शेती क्षेत्र मोठ्या वळणावर आलेले आहे. या क्षेत्रातील बदल हे संपूर्ण अर्थकारण बदलणारे ठरत आहेत. त्यामुळे शेतीमध्ये हवामानासारखे आव्हान पेलताना येणाऱ्या अडचणी आणि कार्बन- स्मार्ट शेती, उत्पादन वाढीचे नवनवीन तंत्र, निसर्गाचा समतोल, हवामानातील बदल, कार्बनचे महत्व आदींबाबत त्यांनी शास्त्रीय माहिती दिली. शाश्वत उत्पादन आणि विकासासाठी मातीचे संवर्धन ही काळाची गरज आहे. यामध्ये जमिनीतील  सूक्ष्म जीव जगवीणे फार महत्वाचे आहे. जमिनीत कार्बन नसेल तर पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होईल. त्यामुळे या दिशेने काम होणे गरजेचे आहे. या निमित्ताने त्यांनी जमीन कधीही उघडी पडू नये, जमिनीचे संवर्धन यासारखे उपायही सुचवले. 'बायोचार' तंत्रज्ञानाची माहिती देताना त्यांनी शेतातील जैविक कचरा जाळण्याऐवजी त्यातुन कार्बन निर्माण करण्याची गरजही अधोरेखित केली. यातून पर्यावरण रक्षण आणि उत्पादन वाढीसारखे लाभ आपण घेऊ शकतो. अशी व्यवस्था उभी राहण्यासाठी शेतकऱ्यांना आणि शासनालाही धोरणं बदलावी लागतील. कार्बन हा अधिक स्थिर असल्याने जमिनीत हजारो वर्ष टिकून राहतो. जास्त खत म्हणजे जास्त उत्पादन, ही मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. भविष्यात शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा लागणार आहे. कारण आजमितीस जमिनिखालिल जैव विविधता धोक्यात आहे. त्यातूनच कार्बन क्रेडिट ही संकल्पना पुढे येत आहे, ज्याद्वारे आपल्याला सर्वांगीण विकास साधता येणार आहे. शेतकरी केवळ उत्पादनावर अवलंबून राहणार नाहीत तर पर्यावरणाची सेवाही करू शकतील. ग्रामीण भागात नवीन पद्धतीची व्यवस्था, रोजगार, व्यवसाय संधी आदी मोठे बदल अपेक्षित आहे. इतकेच नव्हे तर शेतकरी हा भविष्यात हवामानाचा सर्वात मोठा संरक्षक बनु शकतो. मात्र हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पौहचणे गरजेचे आहे. मानवाने या पृथ्वीचा खुप मोठा उपयोग किंवा दुरुपयोग करून घेतला आहे. मात्र यापुढे हे थांबले पाहिजे. अर्थात यामध्ये अनेक अडथळे आहेत; पण आपण वास्तव स्वीकारून सकारात्मक दृष्टीने या विषयाकडे बघितले पाहिजे. तसेच सहकार तत्वावर शेतकऱ्यांची मदत करणे गरजेचे आहे. त्यांना विश्वासात घेऊन या नवीन संकल्पना आणि तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पौहचवावे लागणार आहे. या सर्वांमध्ये दीर्घकालीन शासकीय धोरणंही महत्वाचे ठरेल. शेवटी अन्न सुरक्षा, पर्यावरण, आर्थिक बाबी यासारख्या घटकांमुळे हा एकुणच मानवाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. थोडक्यात सांगायचे तर भविष्यात फक्त निसर्गाकडे जाणारी शेतीच शाश्वत शेती असणार आहे. त्यात सर्वांचा सहभागही तेवढाच महत्वाचा असल्याचेही त्यांनी नमुद केले.
---
*'गोल्डन स्टुडिओ'चा मस्ती भरा समा...*
व्याखानानंतर गोल्डन व्हॉईस स्टुडिओ प्रस्तुत 'मस्ती भरा है समा' हा सदाबहार हिंदी गाण्यांच्या कार्यक्रम झाला. यामध्ये वैष्णवी पगारे, विपूला पवार, शरद डावरे, अशोक वाघ, अशोक महाजन, चंद्रकांत महाले यांनी जुनी लोकप्रिय हिंदी गाणी सादर केली. ज्ञानेश वर्मा यांचे खुमासदार निवेदन आणि सर्वच गायक-गायिकांच्या सुमधुर आवाजातील सादरीकरणाने रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
---
*आजचे (दि. 14) व्याख्यान*
1) वक्ते : संदीप तापकीर (शिवव्याख्याते)
विषय : शिवरायांशी नित्य आठवावे । नि जीवित तृणवत मानावे 
2) इंडोस्टेज क्रियेषण प्रॉडक्शन प्रस्तुत 'शिव छत्रपती : वारसा शौर्याचा'
3) चित्रप्रदर्शन : कलानिकेतन महाविद्यालय, नाशिक

संबंधित बातम्या