केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025'ने सन्मान 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025'ने सन्मान 
  • Positive News
  • ऑगस्ट 2 2025

Share on  

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025'ने सन्मान 

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते आज पुणे येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025'ने सन्मान करण्यात आला. 

याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, लोकमान्य टिळक यांचा स्वाभिमानी बाणा आधुनिक भारतात ज्या व्यक्तींच्या कार्यातून दिसून येतो, अशा व्यक्तींना हा पुरस्कार देण्याची संकल्पना अत्यंत विलक्षण आहे. लोकमान्य टिळक यांचा हाच स्वाभिमानी बाणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अंगी आहे. ते केवळ नेते नसून संशोधक आहेत. कृषी, अभियांत्रिकी आणि विज्ञान अशा विविध क्षेत्रांची त्यांना जाण आहे, त्यातून सामान्य माणसाच्या हिताचा विचार त्यांनी केला आहे. प्रतिकूल परिस्थितीतही धैर्याने आलेल्या प्रसंगावर मात करण्याच्या गुणामुळे ते उत्तम कार्य करू शकले.

देशातील पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी नवे क्षितिज खुले करणारा 'मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग' केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमधून साकारला गेला. गडकरी यांनी रिलायन्स कंपनीचे ₹3600 कोटींचे टेंडर नाकारून, एमएसआरडीसीची स्थापना करून रिलायन्सच्या टेंडरपेक्षा जवळपास अर्ध्या खर्चात पूर्ण केला. त्यांच्या कार्यक्षमतेची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील अत्यंत कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांची ओळख आहे. पायाभूत सुविधा क्षेत्राला दिलेल्या वेगामुळे आज जगाचे भारताच्या प्रगतीकडे लक्ष वेधले जात आहे. सीमावर्ती भागात त्यांनी तयार केलेल्या रस्त्यांमुळे देशाची सुरक्षा अधिक सक्षम झाली. आदिवासी मुलांसाठी शिक्षणाची सोय, विणकरांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, इथेनॉलचे महत्त्व ओळखून त्या दिशेने मार्गक्रमण करणे, तसेच विविध आरोग्य प्रकल्प राबविणारे अतिशय संवेदनशील मनाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच खाद्यसंस्कृतीवरही त्यांचे प्रचंड प्रेम आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. 

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दीर्घायुष्य लाभो आणि आपल्या कार्यातून सामान्य जनतेच्या जीवनात सकारात्मक बदल घडत राहो, अशा शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, इतर आमदार व मान्यवर उपस्थित होते.
 

संबंधित बातम्या