शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीचा आतापर्यंतचा निकाल काय?

शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीचा आतापर्यंतचा निकाल काय?
  • Positive News
  • ऑक्टोबर 28 2026

Share on  

शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीचा आतापर्यंतचा निकाल काय?

पुणे : अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात ज्या निवडणुकीची चर्चा सुरु होती अखेर त्या निवडणुकीचा निकाल आज समोर येत आहे. राज्यातील विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि तीन पदवीधर विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीचा निकाल आज समोर येत आहे. या पाचही जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर आज मंगळवारी या सर्व पाचही जागांची मतमोजणी होत आहे. सर्वच ठिकाणी पोस्टल मतांच्या मोजणीनंतर पहिल्या फेरीतील मतमोजणीचे निकाल समोर येत आहेत. आतापर्यंत नेमके काय कल समोर आले आहेत, तसेच प्रत्येक मतदारसंघात नेमकी कुणाकुणामध्ये लढत आहे, त्याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

पुणे शिक्षक पदवीधर मतदारसंघाचा निकाल काय?
पुणे जिल्ह्यात शिक्षक आणि पदवीधर अशा दोन्ही मतदारसंघांसाठी निवडणूक पार पडत आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीमध्ये प्रचंड रस्सीखेच बघायला मिळाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून या जागेवर दावा करण्यात आला होता. तर भाजपदेखील शेवटपर्यंत या जागेसाठी आग्रही राहिली. परिणामी या ठिकाणी महायुतीत मैत्रीपूर्ण लढत लढवली जात आहे. इथे भाजपकडून कौस्तुभ गावडे उमेदवार आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन सानप यांनी भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे आणि काँग्रेसचे उमेदवार जयंत आसगावकर यांना चॅलेंज दिलेलं आहे. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, भाजपचे कौस्तुभ गावडे हे आघाडीवर आहेत.

पुणे पदवीधर मतदारसंघाचा निकाल काय?
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपकडून उच्चशिक्षित स्मिता जाधव उमेदवार आहेत. त्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून हर्षदा देशमुख-जाधव या उमेदवार आहेत. तसेच ठाकरे गटाचे सुनील मोदी यांनी देखील आपलं नशीब आजमवलं आहे. पण आतापर्यंत समोर आलेल्या प्राथमिक मतमोजणीच्या अंदाजानुसार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या हर्षदा देशमुख-जाधव या आघाडीवर आहेत. पण हा पूर्ण निकाल मानता येणार आहे. अजून मतमोजणी सुरु आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची आतापर्यंतची आकडेवारी आश्चर्यकारक
छत्रपती संभाजीनगर विभाग मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत जोरदार चुरस बघायला मिळत आहे. पहिल्या फेरीच्या मतमोजणीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सतीश चव्हाण हे पिछाडीवर होते. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रतापसिंह पाटील आघाडीवर होते. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत जवळपास ४ हजार २३१ मतांनी प्रतापसिंह पाटील आघाडीवर होते. तर तीनवेळा आमदार राहिलेले सतीश चव्हाण हे पिछाडीवर असल्याची माहिती होती. पण आता सतीश चव्हाण हे आघाडीवर आहेत. दोघांमध्ये अत्यंत अटीतटीची लढत बघायला मिळत आहे. असं असलं तरी अंतिम निकाल काहीही येऊ शकतो. दोन्ही उमेदवार ताकदीचे आहेत.

नागपूर पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी उत्कंठावर्धक वळणावर
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीचे आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार भाजपचे सुधाकर कोहळे आघाडीवर आहेत. तर गेल्या निवडणुकीत निवडून आलेले काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारे हे पिछाडीवर असल्याची माहिती आहे. सध्या मतमोजणी सुरु असून दोन्ही उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर बघायला मिळत आहे. तर अपक्ष उमेदवार नितेश कराळे हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

अमरावती शिक्षक मतदारसंघाचा निकाल काय?
अमरावती मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून किरण सरनाईक हे आतापर्यंत आघाडीवर असल्याची माहिती आहे. तर काँग्रेसच्या अदिती पोहरे या पिछाडीवर आहे. माहितीनुसार, शिंदे गटाचे बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे हे सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अर्थात हा अंतिम निकाल नाही. मतमोजणी सुरु आहे. पण आतापर्यंतचे हे कल आणि मतमोजणीचा निकाल आहे.

संबंधित बातम्या