त्रिखंडी योगामुळे यावेळचा कुंभमेळा 22 महिन्यांचा : सतीश शुक्ल
वसंत व्याख्यानमालेत स्पष्ट केले सिंहस्थ कुंभमेळ्याचे पौराणिक महत्व
नाशिक : नाशिक हे जगातील पहिले तीर्थक्षेत्र आहे. येथील सिंहस्थ कुंभमेळा हादेखील पहिला आहे. तसेच यंदा सिंहस्थ काळात गुरु तीनवेळा वक्री होत आहे. याला त्रिखंडी योग म्हणतात. त्यासाठीचे संपूर्ण वेळापत्रक तयार असून या संपूर्ण काळात केव्हाही गोदास्नान केले तरी अमृतस्नानाचे पुण्य लाभते. एखादी नदी दक्षिणवाहिनी असणे, ही अत्यंत दुर्मिळ बाब असते. खासकरून रामकुंड येथे गोदावरी दक्षिणवाहिनी होत असल्याने येथील स्नानास विशेष महत्व आहे. असे प्रतिपादन नाशिक पुरोहित संघाच्या सिंहस्थ समितीचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी येथे केले.
तब्बल 103 वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या नाशिकच्या वसंत व्याख्यानमालेत त्यांनी रविवारी 24 वे पुष्प गुंफले. त्यामध्ये ते स्व. शांतारामबापू वावरे स्मृती व्याखानात 'सिंहस्थ कुंभमेळा : पौराणिक महत्त्व' या विषयावर बोलत होते. सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते स्व. शांतारामबापू वावरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. ओंकार शौचे यांनी परिचय करून दिला व आभार मानले. प्रथमेश कुलकर्णी यांनी स्वागत केले. दरम्यान, व्याख्यानमालेनिमित्त यंदा प्रथमच राबविण्यात येत असलेल्या चित्र प्रदर्शनाच्या उपक्रमात आज महेश दीक्षित
यांच्या चित्रकृती मांडण्यात आल्या. विशेषतः निसर्गचित्रांसोबतच जैवविविधता, जुन्या वास्तु आणि तत्सम चित्रांचा हा खजिना आणि त्यातील आकर्षक रंगसंगती नाशिककरांना मनापासून आवडल्या. श्री. दीक्षित यांना पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. श्री. शुक्ल म्हणाले की, नाशिकचा कुंभमेळा हा सर्वात पहिला आहे. कारण ज्यावेळी गोदावरीचा उगम झाला, त्यावेळी गुरु सिंह राशीत होता. या अनुषंगाने त्यांनी गोदावरीच्या उगमाची कथा थोडक्यात विशद केली. त्याचवेळी कुंभस्नानाचे महत्वही सांगितले. यामुळेच नाशिकला पद्मनगरी, त्रिकंटक, जनस्थान ते नाशिक या तीर्थक्षेत्राचा असा नाममहिमाही वर्णन केला. ते म्हणाले की, सिंह राशीत जेव्हा गुरुचा प्रवेश होतो, त्यावेळी सिंहस्थ असतो. यावेळी हा योग तब्बल 22 महिन्याचा आहे, कारण या काळात गुरु तीन वेळा वक्री होत आहे. या 22 महिन्यांत केव्हाही येथे स्नान केले तरी अमृतस्नानाचे पुण्य लाभते. गोदावरीचे दर्शन घेतले, स्पर्श केला, पाणी डोक्याला लावली तरी अनेक पापं दूर होतात, असे या गोदावरीचे महात्म्य आहे. त्यामुळे सरळ नदीपात्रात कधीही स्नानासाठी उतरू नये. आधी दर्शन घ्यावे. अशाप्रकारे सिंहस्थ विधी हा तीन दिवसांचा असल्याचे त्यांनी नमुद केले. त्याचप्रमाणे सुंदर नारायण मंदिराची पौराणिक कथा सांगत, या क्षेत्राचे दर्शन करणे किती महत्वाचे आहे याचेही त्यांनी वर्णन केले. तसेच पेशवे काळात 1772 मध्ये कुंभमेळा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर असा दोन ठिकाणी होईल असा निर्णय घेण्यात आला, अन्यथा गोदावरी एकच असल्याने गोदास्नान कुठेही केले तरी सारखेच फळ मिळते, असेही ते म्हणाले.
---
नाशिककरांना भावले 'लोकरंग महाराष्ट्राचे'
व्याख्यानमालेच्या दुसऱ्या सत्रांत आज चेतन लोखंडे प्रस्तुत 'लोकरंग महाराष्ट्राचे' हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये चेतन लोखंडे व अमित पगारे यांनी आपल्या दमदार आवाजात सादर केलेली विविध मराठी गाणी, पोवाडे आणि लोकगिते यांचा रसिक नाशिककरांनी मनमुराद आनंद लुटला. त्यांना सुमेध कांबळे, अक्षय शार्दूल, ओम गायकवाड, करण लोखंडे, चैतन्य पाळेकर, कृष्णा शिरसाठ यांनी संगीतसाथ केली.
---
आजचे (दि. 24) व्याख्यान
1) वक्ते : दीपक शिंपी (वित्तीय जोखीम व्यवस्थापन तज्ज्ञ, मुंबई)
विषय : गुंतवणुकीचे विविध पर्याय, पोर्टफोलीओ मॅनेजमेंट आणि जागतिक परिस्थिती
2) घनश्याम पटेल प्रस्तुत 'सूर शारदा म्यूझिकल नाईट'
3) चित्रप्रदर्शन : कलानिकेतन महाविद्यालय, नाशिक