नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता थेट शेतकर्यांच्या खात्यात जमा!
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजने'च्या अंतर्गत 91,65,156 शेतकऱ्यांना ₹1892.61 कोटींच्या 7व्या हप्त्याचे वितरण केले.
केंद्र शासनाच्या 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने (पीएम – किसान)'च्या धर्तीवर राज्य शासनाने 'नमो शेतकरी महासन्मान किसान योजना' राबवली असून, पात्र शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देत शेती खर्चाला हातभार लावणे हा यामागचा उद्देश आहे.
या सातव्या हप्त्यामध्ये एप्रिल 2025 ते जुलै 2025 या कालावधीतील अनुदानाचा समावेश असून, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना राज्याच्या या योजनेचा लाभ मिळाला आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर हे अनुदान शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रति वर्षी ₹6000 अनुदान दिले जाते. त्यामध्ये राज्य शासनाकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून आणखी ₹6000 वार्षिक अनुदान दिले जाऊन एकूण ₹12,000 ची मदत शेतकऱ्यांना मिळते. आतापर्यंत या योजनेंतर्गत 6 हप्त्यांतून 93.09 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ₹11,130.45 कोटींचे थेट लाभ हस्तांतरित करण्यात आले आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते.