मविप्र समाजाच्या कॉलेज ऑफ फिजिओथेरपीत १७ वा पदवीप्रदान समारंभ आणि ‘IMPACT’ मासिकाचे प्रकाशन संपन्न

मविप्र समाजाच्या कॉलेज ऑफ फिजिओथेरपीत १७ वा पदवीप्रदान समारंभ आणि ‘IMPACT’ मासिकाचे प्रकाशन संपन्न
  • Positive News
  • ऑक्टोबर 17 2025

Share on  

मविप्र समाजाच्या कॉलेज ऑफ फिजिओथेरपीत १७ वा पदवीप्रदान समारंभ आणि ‘IMPACT’ मासिकाचे प्रकाशन संपन्न

 २०२० च्या बॅचच्या विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान — प्रमुख पाहुणे डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांचा ‘आजीवन शिक्षण’चा संदेश 
नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, नाशिकतर्फे १७ वा पदवीप्रदान समारंभ आणि वार्षिक ‘IMPACT’ मासिकाचे प्रकाशन दिमाखात पार पडले. बुधवार, दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज कॅम्पस येथे हा सोहळा उत्साहात संपन्न झाला.
या समारंभात २०२० च्या बॅचमधील विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, संचालक, श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर, नाशिक उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना धैर्य, निष्ठा आणि आजीवन शिक्षणाची वृत्ती जोपासण्याचे आवाहन केले. समाजसेवेत फिजिओथेरपिस्ट्सच्या योगदानाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
यासोबतच अँड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मराठा विद्या प्रसारक समाज यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना आरोग्य क्षेत्रात फिजिओथेरपिस्ट्सची भूमिका भविष्यात अधिक मोलाची ठरणार असल्याचे सांगितले.
समारंभाला देवराम मोगल (उपसभापती, मविप्र समाज), रमेश पिंगळे (संचालक, मविप्र समाज), डॉ. डी. डी. लोखंडे (शैक्षणिक अधिकारी, मविप्र नाशिक), डॉ. सुधीर भामरे (डीन, डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज) आणि प्राचार्य डॉ. अमृत कौर यांची मान्यवर उपस्थिती लाभली.
प्राचार्य डॉ. अमृत कौर यांनी स्वागत व वार्षिक अहवाल सादर करत महाविद्यालयीन उपक्रम, विद्यार्थ्यांची प्रगती आणि प्राध्यापकांच्या यशाचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करताना उत्तम शैक्षणिक व नेतृत्वगुणांसाठी विशेष गौरवचिन्हे देण्यात आली. सभागृह टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेले.
कार्यक्रमाचा विशेष आकर्षणबिंदू म्हणजे महाविद्यालयाच्या वार्षिक ‘IMPACT’ मासिकाचे प्रकाशन होय. या अंकात विद्यार्थ्यांचे लेख, संशोधन कार्य आणि महाविद्यालयीन जीवनाचे विविध पैलू प्रभावीपणे सादर केले आहेत.
 

संबंधित बातम्या