शिक्षक दिन : गुरुवर्यांना कृतज्ञतेचा नमस्कार :डॉ अंजली जाधव, ठाणे v

शिक्षक दिन : गुरुवर्यांना कृतज्ञतेचा नमस्कार :डॉ अंजली जाधव, ठाणे v
  • Positive News
  • सप्टेंबर 5 2025

Share on  

 शिक्षक दिन : गुरुवर्यांना कृतज्ञतेचा नमस्कार :डॉ अंजली जाधव, ठाणे 

दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी भारतात शिक्षक दिन साजरा केला जातो. हा दिवस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त देशभर पाळला जातो. ते महान तत्त्वज्ञ, शिक्षक आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती होते. त्यांनी आपल्या आयुष्यभर शिक्षणाच्या माध्यमातून समाजप्रबोधन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला.

शिक्षक म्हणजे केवळ शाळा–कॉलेजमधले अध्यापक नाहीत. आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती जी आपल्याला काहीतरी शिकवते, योग्य दिशा दाखवते, ती आपली गुरू असते. आई–वडील, आजी–आजोबा, मित्र–मैत्रिणी, नातेवाईक, समाजातील मार्गदर्शक व्यक्ती – हे सर्व आपले शिक्षक आहेत. परंतु बऱ्याच जणांना छोट्या छोट्या गोष्टी मधून आपले मित्र मैत्रिणी नातेवाईक आजूबाजूचे लोक यांच्याकडून मिळणारे  ज्ञान  मान्यच करता येत नाही त्यामुळे ते कधी कृतज्ञता व्यक्तच करत नाहीत. पण यावर नक्की विचार करा. छोट्या छोट्या गोष्टींमधून सकारात्मक गोष्टी शोधून त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजेच स्वतःच्या मनाला शरीराला सकारात्मकता देणे. कृतज्ञतेचा सर्वात मोठा फायदा हा स्वतःला होत असतो हेच अजून बऱ्याच लोकांच्या लक्षात आलेले नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये गुरु शोधण्याचा प्रयत्न जरूर करा.

शिक्षक आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत तर जीवन कसे जगायचे, संकटांना कसे सामोरे जायचे, माणूस म्हणून कसा घडायचा हे शिकवतात. एका योग्य शिक्षकाच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी केवळ यशस्वीच होत नाही तर चांगला नागरिक बनतो.

आजच्या डिजिटल युगात माहिती सहज उपलब्ध असली तरी मूल्यांचा धडा देणारे, जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणारे शिक्षकच असतात. म्हणूनच शिक्षकांचे स्थान नेहमीच पूजनीय राहते.

या दिवशी आपण सर्व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. "गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णु, गुरुर्देवो महेश्वरा" या वचनाप्रमाणेच प्रत्येक गुरु हा देवतुल्य असतो.

चला तर मग, आपण सर्व मिळून आपल्या जीवनातील प्रत्येक शिक्षकाला वंदन करूया आणि त्यांच्या शिकवणीतून आपला समाज अधिक सकारात्मक, निरोगी आणि प्रगतिशील घडवूया. 

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 

संबंधित बातम्या