1890 पासून आजपर्यंत... डबेवाल्यांचा प्रवास एका छताखाली!

1890 पासून आजपर्यंत... डबेवाल्यांचा प्रवास एका छताखाली!
  • Positive News
  • ऑगस्ट 15 2025

Share on  

1890 पासून आजपर्यंत... डबेवाल्यांचा प्रवास एका छताखाली!

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे 'मुंबई डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्रा'चे उदघाटन संपन्न झाले. 1890 साली महादेव बच्चे यांनी सुरू केलेल्या या अद्वितीय सेवेचा इतिहास, वारसा आणि कार्यपद्धती नव्या तंत्रज्ञानासह जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी हे केंद्र उभारण्यात आले आहे.

या केंद्रामध्ये अत्याधुनिक व्हर्चुअल रियालिटी तंत्रज्ञानामार्फत 'डबेवाल्यांच्या' सेवेतील एक संपूर्ण दिवस जिवंत होतो... सकाळी पूजापाठ करण्यापासून दिवस सुरू होतो, त्यानंतर सायकलवर डबे घेऊन चाळीत जाण्यापर्यंत, लोकलच्या आवाजापासून ते रस्त्यावरच्या गोंगाटापर्यंत आणि अखेरीस डब्यातील जेवणाचा घास त्या-त्या व्यक्तीला पोहोचवण्यापर्यंत प्रत्येक टप्पा जणू प्रत्यक्ष अनुभवता येतो. महत्त्वाची बाब म्हणजे इतके डबे एकाचवेळी घेऊन जात असतानाही ज्या व्यक्तीचा डबा त्याच व्यक्तीला पोहोचता केला जातो हे विशेष!

मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'डबेवाला' परंपरेचे कौतुक करताना म्हटले की, आपण ह्यूमन इंटेलिजन्सने जे व्यवस्थापन कौशल्य निर्माण केले आहे, ते जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञानापेक्षाही सरस आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डपासून ते विविध संशोधन संस्थांच्या अभ्यासापर्यंत, संपूर्ण जग आपल्याकडे आश्चर्याने पाहते. विठ्ठलाचे आशीर्वाद आणि वारीची ही समृद्ध परंपरा आपल्या पाठीशी आहे. म्हणून आपले काम पिढ्यानपिढ्या अव्याहतपणे सुरु आहे.

डबेवाल्यांसाठी सन्मानासोबतच हक्काचे घर मिळावे यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर योजनांच्या माध्यमातून केवळ ₹25,50,000 मध्ये 500 चौरस फूटांचे सुसज्ज घर उपलब्ध होणार आहे. या गृहप्रकल्पाला रेल्वे स्थानकांशी थेट जोडणाऱ्या पायाभूत सुविधांचा समावेश करण्यात येणार असून, भविष्यातही डबेवाल्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील.

येत्या काळात नव-नव्या कल्पनांच्या माध्यमातून डबेवाल्यांचे कार्य वैश्विक स्तरावर नेण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धारही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार श्रीकांत भारतीय, आमदार योगेश सागर, आमदार कॅप्टन आर. तमील सेल्वन व इतर मान्यवर उपस्थित होते.
 

संबंधित बातम्या