CRPF च्या परेडमध्ये इतिहास घडवणारी सिमरन बाला —
पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पुरुष तुकडी.
नवी दिल्ली
देशाच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीत कर्तव्य पथावर भव्य आणि शिस्तबद्ध परेडचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 90 मिनिटांहून अधिक काळ चाललेल्या या परेडमध्ये देशाच्या संरक्षण, सुरक्षा आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडले.
यंदाचा प्रजासत्ताक दिन अनेक अर्थांनी विशेष ठरला. ‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या सर्वांमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते CRPF च्या परेडचे नेतृत्व करणाऱ्या 26 वर्षीय सिमरन बाला यांनी.
जम्मू आणि काश्मीरमधील रहिवासी असलेल्या सिमरन बाला या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) सहाय्यक कमांडंट आहेत. त्यांनी 26 जानेवारी रोजी झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये CRPF च्या संपूर्ण पुरुष तुकडीचे नेतृत्व केले.
विशेष बाब म्हणजे, १४० हून अधिक पुरुष जवानांच्या तुकडीचे नेतृत्व पहिल्यांदाच एका महिला अधिकाऱ्याने केले, ज्यामुळे CRPF च्या इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला. या ऐतिहासिक क्षणामुळे देशभरात अभिमान आणि प्रेरणेची भावना निर्माण झाली आहे.
सिमरन बाला यांचे हे नेतृत्व केवळ वैयक्तिक यश नाही, तर भारतीय सुरक्षादलांमध्ये महिलांची वाढती भूमिका, नेतृत्वक्षमता आणि विश्वासार्हता यांचे प्रतीक मानले जात आहे. त्यांनी आपल्या धाडसाने, शिस्तीने आणि आत्मविश्वासाने हजारो तरुणींना नवी प्रेरणा दिली आहे.
हा क्षण भारतीय लोकशाही, समान संधी आणि महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले एक ठोस पाऊल असल्याचे अनेकांनी व्यक्त केले आहे.