नमस्कार वाचकहो, होळीच्या सर्वांना द पॉझिटिव न्यूज वर्ल्ड तर्फे खूप खूप शुभेच्छा...
आज १३ मार्च २०२५ रोजी रात्री होलिका दहन आहे तर उद्या १४ मार्च रोजी धूलिवंदन आहे.
होळीच्या दिवशी भगवान नरसिंहाची आरती करणाऱ्या व्यक्तीला आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही, त्याला प्रत्येक क्षेत्रात यश मिळते आणि घरात सुख-समृद्धी वाढते. होळीचा सण फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. या उत्सवाची सुरुवात होळी पेटवून होते. धार्मिक ग्रंथांनुसार, होलिका दहनाच्या आधी होलिमातेची पूजा केली जाते. या काळात भगवान नरसिंहांची आरती करण्याची परंपरा आहे. ते खूप शुभ मानले जाते.
कोकणात शिमगोत्सवात जोरात....
कोकणात सण म्हटलं की वेगवेगळ्या रूढी, परंपरा आणि उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे. गणेशोत्सवानंतर कोकणातील सर्वात मोठा सण म्हणजे शिमगोत्सव. शिमगोत्सवात सिंधुदुर्गात वेगवेगळ्या रूढी, परंपरा पहायला मिळतात. अशीच एक आगळीवेगळी पूर्वापार चालत आलेली परंपरा म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गावचा 'गिरोबा उत्सव' होय. सांगेली गावात महाशीवरात्रीला फणसाचे झाड देव म्हणून निवडले जाते. होळीला हे झाड तोडून विशिष्ट गोलाकार आकार देऊन त्याची मिरवणूक काढण्यात येते आणि विधीवत प्राणप्रतिष्ठापणा करून पूजले जाते. सांगेली गावचं ग्रामदैवत फणसाचं झाड असलेले हे देशातील एकमेव मंदिर आहे. कोकणात इतर मंदिरात दगडी पाषण असते. मात्र, सांगेली गावात मात्र फणसाच्या झाडापासून शिवलिंगाच्या आकाराचा पाषण बनवले जाते. सांगेली गावात फणसाच्या झाडाला “गिरिजानाथ” म्हणून दैवत्व मानलं जात. गिरोबाचे पाषाण हे फणसाच्या खोडातून तयार होते. यामुळे सांगेलीतील ग्रामस्थ फणसाच्या झाडाला देव मानतात.