अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यातील १८ वर्षीय बिशू लिंबू याने NEET परीक्षेत ६१० गुण मिळवत अखिल भारतीय स्तरावर ७,३२० वा क्रमांक पटकावला आहे. वीज, इंटरनेट आणि मूलभूत सुविधांचा अभाव असतानाही त्याने डॉक्टर होण्याचे स्वप्न जिवंत ठेवत हे यश संपादन केले आहे.
अरुणाचल प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या तिनसुकिया जिल्ह्यातील 'नं. २ नकोंग पाथार' या गावात बिशूचे कुटुंब राहते. गावात आजही नियमित वीजपुरवठा नाही आणि मोबाईल नेटवर्क मिळवण्यासाठी रस्त्यापर्यंत पायी जावे लागते. अशा परिस्थितीत बिशूने अभ्यास सुरू ठेवला.
बिशूचे वडील फौदे लिंबू अल्पभूधारक शेतकरी असून स्थानिक बाजारात भाजीपाला विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आई ओम कुमारी लिंबू शेतात मजुरी करण्याबरोबरच कधीकधी चहाच्या मळ्यातही रोजंदारीवर काम करतात. आजही हे कुटुंब पानांच्या छपराच्या कच्च्या घरात राहत असून घरात वीजजोडणी नाही.
इंटरनेटची सुविधा नसल्याने अभ्यासाचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी बिशूला अनेकदा गावाबाहेरील रस्त्यापर्यंत चालत जावे लागत असे. डिगबोई येथील एका खासगी शैक्षणिक संस्थेने दिलेल्या शिष्यवृत्तीमुळे त्याला इयत्ता अकरावी आणि बारावीचे शिक्षण पूर्ण करता आले. पुढील शिक्षणासाठी तो नातेवाईकांच्या मदतीवर अवलंबून होता.
बिशूची आई ओम कुमारी यांनी सांगितले की, "आम्हाला NEET परीक्षेचे महत्त्वही पूर्णपणे माहिती नव्हते. आमचा मुलगा डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहत होता आणि त्याच्या यशामुळे आम्हाला मोठा आनंद झाला आहे. मात्र आता वैद्यकीय शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा, ही आमच्यासमोरची मोठी चिंता आहे."
बिशूने प्राथमिक शिक्षण राजनगर बाजनाथ एल.पी. स्कूलमध्ये, तर माध्यमिक शिक्षण जनजाती हायस्कूल, केतेतोंग येथे पूर्ण केले. त्यानंतर डिगबोई येथे शिक्षण घेत असताना राहण्याचा आणि दैनंदिन खर्चाचा मोठा भार नातेवाईकांनी उचलला.
"माझे शिक्षण शिष्यवृत्तीमुळे मोफत झाले. मात्र राहण्याचा आणि इतर खर्चासाठी कुटुंबाकडे पैसे नव्हते. नातेवाईकांच्या मदतीमुळेच मी शिक्षण पूर्ण करू शकलो," असे बिशूने सांगितले.
आता गुवाहाटी मेडिकल कॉलेज, आसाम मेडिकल कॉलेज किंवा AIIMS-गुवाहाटीमध्ये प्रवेश मिळवण्याचे त्याचे लक्ष्य असून, AIIMS-गुवाहाटीमध्ये प्रवेश मिळावा यासाठी तो प्रयत्नशील आहे.
बिशू लिंबूची ही यशोगाथा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून चिकाटी, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर स्वप्ने पूर्ण करता येतात, याचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
डिस्क्लेमर :
ही बातमी प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच्या आधारे घेतलेले असून, केवळ माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात येत आहे.