उन्हाळ्यात प्या अशी नैसर्गिक सरबते
भाग 11
उन्हाळ्यातील उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काही नैसर्गिक सरबती घरच्या घरी बनवून पिणे आरोग्यासाठी हितकारक ठरते कारण बाटली बंद सरबत पिल्याने फायद्यापेक्षा तोटे होण्याचे जास्त धोके असतात.
गुलाब सरबत
उन्हाळ्याच्या कडक महिन्यांत तुमची तहान भागवण्यासाठी गुलाब सरबता पेक्षा चांगले काहीही नाही. ते केवळ चविष्टच नाही तर आरोग्यदायी देखील आहे. घरच्या घरी गुलाब सरबत कसा बनवायचा हे जाणून घ्या.
कृती:
१ कप ताज्या देशी गुलाबाच्या पाकळ्या घ्या आणि चार ते पाच वेळा धुवा जेणेकरून त्यातील कोणतीही घाण निघून जाईल.
एका भांड्यात 4 कप पाणी आणि 1 कप कप गुलाबाच्या पाकळ्या घाला.
पाकळ्या पाण्यात सुमारे १० मिनिटे मंद गॅसवर उकळवा.
पॅन गॅसवरून काढा आणि गुलाबाचे पाणी थंड होऊ द्या.
थंड झाल्यावर चाळणीवरून गाळून घ्या
गुलाबाच्या पाण्यात एक कप खडीसाखर पावडर घाला आणि पूर्णपणे विरघळेपर्यंत चांगले मिसळा. आवडत असल्यास आणि शक्य असल्यास त्यात अर्धा कप मध मिक्स करा.
त्यामध्ये चार ते पाच थेंब रोज इसेन्स मिक्स करा. काचेच्या बरणीमध्ये हे रोज सिरप भरून ठेवा.
प्यायला देताना ग्लासमध्ये दहा ते पंधरा मिनिट भिजवलेला सब्जा 2 चमचे , चार ते पाच चमचे रोज सिरप, चवीप्रमाणे लिंबू रस मिक्स करा .
थंड पाणी, हवा असल्यास थोडा बर्फ मिक्स करून प्यायला द्या.
टीप:
रोज सिरप जर दुधामध्ये मिक्स करून प्यायचे असेल तर त्यामध्ये लिंबू रस घालू नका.
थंड दुधामध्ये चार ते पाच चमचे रोज सिरप आणि भिजवलेला सब्जा घालून हे थंडगार गुलाब युक्त दूध प्यायला द्या.
फायदे:
गुलाब पाकळ्या मध्ये अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे ते शरीरातील फ्री रॅडिकल्स ना कमी करतात.
गुलाब पाकळ्या प्रकृतीने थंड असतात त्यामुळे उन्हाळ्यात होणारे डीहायड्रेशन कमी करून आपल्याला ऊर्जा देतात.
गुलाब पाकळ्या पित्तशामक असतात त्यामुळे पोट शांत राहते आणि मन प्रसन्न होते.
गुलाबाचा मंद सुगंध अरोमाथेरपीचे काम करतो आणि आपले मन शांत ठेवण्यासाठी मदत करतो.
पाणी युक्त गुलाब सरबत मध्ये जेव्हा लिंबू मिक्स करतो त्यातील विटामिन सी आपल्या त्वचेसाठी पोषक ठरतात तसेच आपली प्रतिकारशक्ती वाढवतात.
डॉ अंजली जाधव,
ठाणे