उन्हाळ्यात प्या अशी नैसर्गिक सरबते
भाग 8
उन्हाळ्यातील उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काही नैसर्गिक सरबते घरच्या घरी बनवून पिणे आरोग्यासाठी हितकारक ठरते कारण बाटली बंद सरबत पिल्यामुळे फायद्यापेक्षा तोटे होण्याचे जास्त धोके असतात.
करवंदाचे सरबत
उन्हाळा सुरू झाला की बराच रानमेवा पण बाजारात दिसू लागतो. निसर्गानेच उन्हापासून आपली काळजी घेण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत हे मात्र खरे. या रानमेव्या पैकीच एक आहे करवंद .या सरबताचा रंग पण खूप आकर्षक दिसतो.
कृती
प्रथम करवंद स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.
करवंदांचा चीक जाण्यासाठी गरम पाण्यात 10 मिनिटे बुडवून ठेवा.
करवंद फोडून
बिया वेगळ्या करा.
गर, साखर आणि मीठ एकत्र करा, मिक्सर ला हलकी फिरवून घ्या आणि चाळणीवर टाकून गाळून घ्या . गरजेप्रमाणे पाणी मिसळा आणि चवीसाठी चाट मसाला व जिरेपूड टाका.
त्यानंतर थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा.
थंड झाले की प्यायला दया.
करवंदाचे फायदे
अँटिऑक्सिडंट ने भरपूर असे बेरीज या प्रकारातले हे फळ आहे.
करवंदाचे सरबत शरीराला ताजेपणा आणि ऊर्जा देते.
हे सरबत अॅसिडिटी कमी करण्यास मदत करते.
मळमळ आणि उलट्या होत असल्यास, हे सरबत आराम देऊ शकते.
करवंदामध्ये कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात.
उन्हाळ्यामध्ये हे सरबत शरीराला थंड ठेवण्यास मदत करते.
डॉ अंजली जाधव, ठाणे