राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्यूटला प्रिमियर रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून विकसित करणार
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नागपूर येथे राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्यूट येथील 'स्वस्ति निवास'चे भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कॅन्सर पीडितांच्या परिवारासाठी राहण्याची जागा मिळावी यासाठी 'स्वस्ति निवास'ची निर्मिती करण्यात आली आहे. रुग्णांच्या सोयी-सुविधांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याचा राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्यूटचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. आगामी काळात राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्यूटला प्रिमियर रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून विकसित करणार, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कॅन्सर रुग्णांचा लांबचा प्रवास आणि अपुरी निवास व्यवस्था यामुळे उपचारासाठीच्या अपॉईंटमेंट्स चुकू शकतात किंवा उपचारास विलंब होऊ शकतो. ही समस्या सोडविण्यासाठी डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्था व्यवस्थापनामार्फत कॅन्सर रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी 'स्वस्ति निवास' तयार करण्यात येत आहे. पेर्नोड रिकार्ड इंडिया या बहुराष्ट्रीय कंपनीने आपल्या CSR उपक्रमाद्वारे 'स्वस्ति निवास' प्रकल्पाला सहाय्य केले आहे.
‘स्वस्ति निवास’च्या विशेषता :
✅ ‘स्वस्ति निवास’च्या प्रस्तावित डिझाईनमध्ये सुविधा केंद्र संकुल, फूड कोर्ट, आणि एकूण 1.7 लाख चौ. फूट बांधकाम क्षेत्राचा समावेश
✅ 'स्वस्ति निवास'च्या माध्यमातून 400 रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी निवासाची व्यवस्था
✅ रुग्णांचा उपचारासाठी दीर्घकाळ राहण्याचा आर्थिक भार कमी होऊन कॅन्सर उपचार अधिक परवडणारे होण्यास मदत
यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. समीर मेघे, पेर्नोड रिकार्ड इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिन टुबुल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.