LPG, ITR, रेल्वे आणि क्रेडिट कार्ड… !ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच मोठे बदल!

LPG, ITR, रेल्वे आणि क्रेडिट कार्ड… !ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच मोठे बदल!
  • Positive News
  • ऑगस्ट 2 2026

Share on  

LPG, ITR, रेल्वे आणि क्रेडिट कार्ड… !ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच मोठे बदल!

     मुंबई : आज म्हणजेच १ ऑगस्ट २०२६ पासून सामान्य माणसाचे दैनंदिन आयुष्याशी संबंधित अनेक महत्त्वाचे बदल लागू झाले आहेत. १ ऑगस्टपासून लागू झालेले हे सर्व बदल थेट तुमच्या खिशावर आणि रोजच्या आर्थिक व्यवहारांवर परिणाम करणारे आहेत.
      यामध्ये एलपीजी सिलेंडरचे दर, रेल्वेची तत्काळ तिकीट बुकिंग, सेंट्रल केवायसी २.०, क्रेडिट कार्डचे नियम, इंधनाच्या दरांचा आढावा आणि इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत या गोष्टींचा समावेश आहे. या बदलांची माहिती नसल्यास तुम्हाला नाहक अतिरिक्त खर्च किंवा अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
      दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सरकारी तेल कंपन्या एलपीजी सिलेंडरच्या किमतींचा आढावा घेतात. याच प्रक्रियेअंतर्गत १ ऑगस्टपासून घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आलेत. जुलै महिन्यात १८३ रुपयांची कपात केल्यानंतर, ऑगस्टच्या सुरुवातीलाच इंधन कंपन्यांनी पुन्हा एकदा दरकपात करून हॉटेल, रेस्टॉरंट आणि व्यवसायिकांना मोठा दिलासा दिला आहे. गेल्या दोन महिन्यांत दिल्लीत व्यावसायिक सिलेंडर तब्बल ३८५.५० रुपयांनी स्वस्त झाला आहे. आज यामध्ये १९२ रुपयांची कपात करण्यात आली. तर घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
      रेल्वे स्टेशनच्या रिझर्व्हेशन काउंटरवरून तत्काळ तिकीट घेणाऱ्या प्रवाशांसाठी नवी व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. पश्चिम मध्य रेल्वेने १ ऑगस्टपासून टोकन पद्धत लागू केली आहे. लांबच लांब रांगा कमी करणं आणि तिकीट बुकिंग प्रक्रिया अधिक सुटसुटीत करणे हा यामागचा उद्देश आहे. आता प्रवाशांना प्रथम टोकन मिळेल आणि त्याच क्रमानं तिकिटे दिली जातील, ज्यामुळे काउंटरवरील गर्दी टाळता येईल.
       बँका, विमा आणि इतर वित्तीय संस्थांमध्ये ग्राहकांची ओळख पटवण्याची प्रक्रिया अधिक सुरक्षित करण्यासाठी सेंट्रल केवायसी (CKYC 2.0) टप्प्याटप्प्यानं लागू केली जात आहे. ही नवीन यंत्रणा आल्यानंतर ग्राहकांना वारंवार केवायसी कागदपत्रं जमा करण्याची गरज भासणार नाही आणि पडताळणी प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक जलद आणि सुरक्षित होईल.
       १ ऑगस्टपासून अनेक बँकांनी आपल्या क्रेडिट कार्डशी संबंधित नियमांमध्ये फेरबदल केले आहेत. नव्या नियमांनुसार रिवॉर्ड पॉईंट्स, उशिरा पेमेंट केल्याचा दंड, प्रोसेसिंग फी आणि इतर शुल्कांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे नियमित क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांनी आपल्या बँकेच्या नवीन अटी नक्की तपासून घ्याव्यात, जेणेकरून अतिरिक्त शुल्काचा फटका बसणार नाही.
       महिन्याच्या सुरुवातीला तेल कंपन्या एलपीजीसोबतच एव्हिएशन टर्बाइन फ्युएल म्हणजेच विमान इंधनाच्या (ATF) दरांचाही आढावा घेतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींवर आधारित हे नवीन दर ठरवले जातात. दिल्लीमध्ये एव्हिएशन टर्बाइन फ्युएलच्या (एटीएफ) दरात प्रति लिटर ५ रुपयांची कपात करण्यात आली असून, नवीन दर १,१०,००० रुपये प्रति किलोलिटर झाला आहे. एटीएफच्या दरातील या कपातीमुळे भविष्यात विमान कंपन्यांना दिलासा मिळेल, परिचालन खर्च कमी होईल, ज्यामुळे हवाई प्रवाशांसाठी विमान भाडं स्थिर राहण्याची अपेक्षा आहे.
       कर्मचारी आणि ज्यांच्या खात्यांचे ऑडिट गरजेचं नाही अशा वैयक्तिक करदात्यांसाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२६ ही होती. आता या मुदतीनंतर जे करदाते ITR-1 किंवा ITR-2 द्वारे रिटर्न दाखल करतील, त्यांना विलंब शुल्क द्यावं लागेल. या दंडाची रक्कम करदात्याच्या एकूण करपात्र उत्पन्नानुसार निश्चित केली जाईल. त्यामुळे ज्यांनी अद्याप रिटर्न भरलेले नाही, त्यांनी अनावश्यक आर्थिक दंड टाळण्यासाठी हे काम लवकरात लवकर पूर्ण करणं आवश्यक आहे.
       इंधन कंपन्यांनी वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सीएनजीच्या आणि पाईपलाईनद्वारे घरांना पुरवल्या जाणाऱ्या पीएनजी गॅसच्या दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. गेल्या दोन महिन्यांपासून, म्हणजेच जून २०२६ पासून, पीएनजीच्या दरांमध्ये कोणताही बदल नोंदवला गेला नाही.

संबंधित बातम्या